पनवेलमध्ये दरडींची दहशत
By Admin | Updated: June 25, 2015 02:57 IST2015-06-25T02:57:18+5:302015-06-25T02:57:18+5:30
पनवेल तालुक्याचा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात आला असून तेवीस गावे दरडीच्या दहशतीखाली असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे

पनवेलमध्ये दरडींची दहशत
प्रशांत शेडगे, पनवेल
पनवेल तालुक्याचा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात आला असून तेवीस गावे दरडीच्या दहशतीखाली असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. यात मोर्बे विभागातील सर्वाधिक आठ गावांचा समावेश आहे. त्यातही धोदानी आणि हरिग्राम येथील आदिवासी वाडीला अधिक धोका आहे. या सर्व गावांची मिळून ११,७१८ इतकी लोकवस्ती असून सर्वच ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली जगत आहेत.
मोर्बे, धोदाणी डोंगराळ भाग असून त्याच्या पायथ्यालगत अनेक छोट्या-मोठ्या आदिवासी वाड्या व पाडे आहेत. पावसात अनेकदा या वाड्यांचा संपर्क तुटतो. त्याचबरोबर दरड कोसळण्याची भीती निर्माण होते. २००५ साली हरिग्राम येथील डोंगराला मोठी भेग पडली होती, तर काही भाग खचला होता. त्यामुळे डोंगरालगतच्या आदिवासी वाड्यांनाही धोका निर्माण झाला होता. धोदानी येथील आदिवासी वाडीचा संपर्क तुटला होता.
यंदा आतापर्यंत झालेल्या पावसाचा जोर पाहता, आपत्ती व्यवस्थापन विभागाने तालुक्यातील २३ गावांना दरडीचा धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे. यात ओवळे, कर्नाळा, तळोजा व पनवेल ग्रामीणमध्ये डोंगराच्या पायथ्याशी काही गावे व आदिवासी वाड्यांचा समावेश आहे. असे असले तरी यासंदर्भात प्रशासनाकडून फारशा उपाययोजना झालेल्या दिसून येत नसल्याची प्रतिक्रिया आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा यांनी व्यक्त केली आहे.