पनवेलमध्ये सहा तास बत्ती गुल
By Admin | Updated: June 19, 2015 21:57 IST2015-06-19T21:57:08+5:302015-06-19T21:57:08+5:30
पावसाच्या सुरूवातीलाच पनवेल परिसरातील महावितरणचे आपत्तीचे व्यवस्थापन कोलमडले आहे. पनवेल आणि खांदा वसाहतीतील शुक्रवारी तब्बल

पनवेलमध्ये सहा तास बत्ती गुल
पनवेल : पावसाच्या सुरूवातीलाच पनवेल परिसरातील महावितरणचे आपत्तीचे व्यवस्थापन कोलमडले आहे. पनवेल आणि खांदा वसाहतीतील शुक्रवारी तब्बल सहा तास वीजपुरवठा खंडित झाला. वीज नेमकी कोणत्या कारणामुळे गेली याबाबत महावितरणच्या कार्यालयातून कोणतीही माहिती देण्यात नव्हती. याशिवाय ठिकठिकाणी होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे महावितरणला भर पावसात घाम फुटला आहे.
वीज ग्राहकांच्या वाढत्या संख्येचा विचार करता अनेक सुधारणा अपेक्षित असताना त्या केवळ कागदावरच आहेत. त्याचबरोबर एखाद्या वेळी वीजपुरवठा खंडित झाला तरी त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करणे क्रमप्राप्त आहे. याचे कारण सिडको वसाहतीत वीजगळती व थकबाकीचे प्रमाण अतिशय कमी आहे. नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळत नाही. बत्ती गुल होणे ही नित्याचीच बाब झाली आहे.
सेक्टर-९ मध्ये ब्रेक डाऊन झाल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खांदा वसाहतीत सेक्टर-९ व ७ मधील वीजपुरवठा सुरळीत झाला. तशीच परिस्थिती ठाणा नाका परिसराची होती.
सकाळी ११ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सायंकाळी सहा वाजता सुरळीत करण्यात महावितरणला यश मिळाले. या व्यतिरिक्त गुरूवारी रात्रभर पनवेल शहरात विजेचा लपंडाव सुरू होता. रविवारी अशाच प्रकारे एक झाड कोसळल्यामुळे खांदा वसाहत आणि नवीन पनवेलमध्ये सात तास वीजपुरवठा खंडित झाला होता.