Join us
Daily Top 2Weekly Top 5

Pandharinath Sawant: बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू शिलेदार, ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 09:53 IST

प्रबोधनकारांशी संपर्कात आल्यावर त्यांच्याकडून पंढरीनाथांना पत्रकारितेचे बाळकडू मिळाले. बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे यांचेही ते विश्वासू सहकारी होते.

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचे ८ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ च्या सुमारास राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. लालबागमधील दिग्विजय मिल पत्रा चाळ या त्यांच्या राहत्या घरून दुपारनंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार असून भोईवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पंढरीनाथ सावंत हे प्रबोधनकार ठाकरे यांचे शिष्य, बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू शिलेदार आणि ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय होते. महाडचे विन्हेरे गाव हे त्यांचे मूळ होते. वडील पोलीस खात्यात नोकरीत असल्याने भोईवाडा हेड क्वार्टर येथे त्यांचे बालपण गेले. उत्तम चित्रकला येत असल्याने ते प्रसार माध्यमाशी जोडले गेले. प्रबोधनकारांशी संपर्कात आल्यावर त्यांच्याकडून पंढरीनाथांना पत्रकारितेचे बाळकडू मिळाले. बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे यांचेही ते विश्वासू सहकारी होते. शोध पत्रकारिता करत त्यांनी अनेक जटिल विषयांवर सखोल माहिती मिळवली आणि लेखांद्वारे प्रसिद्ध केली. इंग्रजीवर प्रभुत्त्व असल्याने आंतरराष्ट्रीय विषयावरही त्यांनी शोध निबंध लिहिले. 'हिटलर'ची इत्थंभूत माहिती मिळवून त्याचे चरित्रही प्रकाशित केले. 'मी पंढरी गिरणगावचा' हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले. मार्मिक, श्री, प्रभंजन, ब्लीट्स, लोकमत, पुढारी या साप्ताहिक तसेच वृत्तपत्रात त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. तसेच ८४ वर्षांचे असेपर्यंत मार्मिक साप्ताहिकाचे कार्यकारी संपादकपद त्यांनी भूषवले. 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय यांचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार तसेच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

टॅग्स :पत्रकारमुंबई