Join us  

पणजीच्या महापौरांनी घेतली मुंबईच्या महापौरांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 6:28 PM

कचरा व्यवस्थापनासह अनेक बाबींवर चर्चा

पणजी/मुंबई: कचरा व्यवस्थापन, खड्डे बुजवण्याचे उपाय यांची माहिती घेण्यासाठी पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी मुंबई महापालिकेचे विश्वनाथ महाडेश्वर यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही महापौरांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. यावेळी मडकईकर यांनी महाडेश्वरांना गोवा भेटीचं निमंत्रण दिलं. या भेटीनंतर भ्रमणध्वनीवरुन मडकईकर यांनी सांगितले की, मुंबईत कचरा संकलन आणि विल्हेवाटीची प्रक्रिया रात्री केली जाते. दीड कोटी लोकसंख्या असल्यानं या कामाचा आवाका मोठा आहे. रुग्णालयं, शाळा तसेच तसेच सार्वजनिक वाहतुकीसाठी बेस्ट बससेवा अशा अनेक गोष्टी मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येतात. तेथील कचरा व्यवस्थापनाबद्दल महाडेश्वर यांच्याकडून जाणून घेतलं.

मुंबईतही पावसात रस्त्यांमध्ये खड्डे पडल्यानं दूर्दशा झाली आहे. तिथे महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी कोणते उपाय हाती घेतले आहेत, हेदेखील जाणून घेतल्याची माहिती मडकईकर यांनी दिली. पणजी शहरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे तयार काँक्रिटचा वापर करुन रात्रीच्यावेळी बुजवण्याचे काम महापालिकेने केलं होतं. यासाठी सुमारे ८0 क्युबिक मीटर तयार काँक्रिट लागल्याचं मडकईकर यांनी सांगितलं. शिक्षणमंत्र्यांचीही घेतली भेट महापौर मडकईकर यांनी नरिमन पॉइंट येथे शालेय शिक्षण क्रीडामंत्री आशिष शेलार यांचीही सदिच्छा भेट घेतली व त्यांनाही गोवा भेटीचं निमंत्रण दिलं.  

टॅग्स :खड्डेमुंबई महानगरपालिकामहापौर