बाळासाहेबांच्या स्मृतिदिनासाठी पालिका सज्ज
By Admin | Updated: November 17, 2015 02:40 IST2015-11-17T02:40:26+5:302015-11-17T02:40:26+5:30
दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ महापालिकेतर्फे नैसर्गिक साधनांचा वापर करून विकसित करण्यात आले आहे. १७ नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनासाठी पालिका सज्ज
मुंबई : दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ महापालिकेतर्फे नैसर्गिक साधनांचा वापर करून विकसित करण्यात आले आहे. १७ नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त नागरिक या ठिकाणी स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने हाती घेतलेली कामे पूर्ण झाली आहेत.
स्मृतिस्थळाभोवतीच्या संरक्षक जाळीची रंगरंगोटी करण्यात आली आहे. आतील परिसरात फुलांची सजावट करण्यात आली आहे. आवश्यक तेथे लाद्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. सोनचाफ्याची रोपे लावण्यात आली आहेत. विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या वीर सावरकर मार्गावरील रस्ता दुभाजक आणि पदपथ यांचीही दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यात आली आहे. स्मारकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या जनतेकरिता सुविधा म्हणून पिण्याच्या पाण्याचे दोन टँकर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परिसरात स्वच्छता राहावी, म्हणून अतिरिक्त कामगार नेमण्यात आले आहेत. या शिवाय परिसरात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी धूम्रफवारणीदेखील करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
स्मृतिस्थळ कोणत्याही प्रकारच्या सिमेंट बांधकामाशिवाय फक्त नैसर्गिक दगड, माती, विटा, विविध फुलझाडे यांचा उपयोग करून विकसित करण्यात आले आहे.
स्मारकासाठी महापालिकेने आठशे चौरस फुटांची जागा निश्चित केली आहे. ही जागा सागरतटीय नियमन क्षेत्रात (सीआरझेड), तसेच हेरिटेजअंतर्गत येत असल्याने, या
दोन्ही बाबतीत कार्यवाही पूर्ण करून हे स्मृतिस्थळ उभारले.
स्मृतिस्थळाचा परिसर लाल आग्रा दगडाच्या लादी,
माती व हिरवळ इत्यादींनी सुशोभित करण्यात आला आहे. स्मृतिस्थळाच्या ठिकाणी आकर्षक रोषणाईचे प्रकाशदिवे लावण्यात आले आहेत.
या ठिकाणी बाळासाहेबांनी आपल्या षष्ठ्यब्दीनिमित्त गुलमोहराचे रोपटे लावले होते, तर मीनाताई ठाकरे यांनी त्याच परिसरात बकुळीचे रोपटे लावले होते. या दोन झाडांमधील जागेत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ साकारण्यात आले आहे.