पालघर भ्रष्टाचाराचे आॅडिट २१ ला
By Admin | Updated: December 14, 2014 23:38 IST2014-12-14T23:38:17+5:302014-12-14T23:38:17+5:30
जव्हारमधील रोजगार हमी योजनेंतर्गत कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी चांभारशेत व परिसरातील १५ ग्रामपंचायतींचे सोशल आॅडिट २१ डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान जव्हारच्या चांभारशेतपासून होईल.

पालघर भ्रष्टाचाराचे आॅडिट २१ ला
हितेन नाईक, पालघर
जव्हारमधील रोजगार हमी योजनेंतर्गत कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी चांभारशेत व परिसरातील १५ ग्रामपंचायतींचे सोशल आॅडिट २१ डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान जव्हारच्या चांभारशेतपासून होईल.
पालघर जिल्ह्यातील जव्हारच्या चांभारशेत, खरोंडा इ. आदिवासीबहुल भागात रोहयोअंतर्गत कामे बोगस पद्धतीने होऊन त्यात दीड कोटी रू.चा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी असून विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रुक ग्रामपंचायतअंतर्गत गावातही विहीर खोदणे, स्मशानभूमी बांधणे, नर्सरी उभारणे इ. कामांत तर डहाणू तालुक्यातील वाघाडी, वनई इ. भागातही या योजनेंतर्गत मोठा भ्रष्टाचार झाल्याची प्रकरणे पुढे आली आहेत. लोकमतने या प्रकरणांचा पाठपुरावा सुरू ठेवल्यानंतर मंत्रालयीन पातळीवरून सोशल आॅडिटसाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख राहुल तिवरेकर, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ डिसेंबर रोजी जव्हारच्या आदिवासी भवनमध्ये सोशल आॅडिटचे प्रशिक्षण शिबिर पार पडले होते.
पालघर जिल्ह्यातील हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी व यातील दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी आता २१ ते २५ डिसेंबर दरम्यान सोशल अॅडिट होणार असून प्रमुख समन्वयक तिवरेकर, उपजिल्हाधिकारी पारधे, संबंधित भागातील तहसीलदार गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तक्रारदार, लाभार्थी इ.चा यामध्ये समावेश असणार आहे.