पालघर लवकरच मॉडेल जिल्हा होणार

By Admin | Updated: July 3, 2015 22:24 IST2015-07-03T22:24:35+5:302015-07-03T22:24:35+5:30

रस्ते बांधणे म्हणजे विकास नव्हे तर सर्वसामान्य शेतकरी व मनुष्य यांना चांगले दिवस आणणे म्हणजे विकास होय. आज जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासनासह

Palghar will soon be the model district | पालघर लवकरच मॉडेल जिल्हा होणार

पालघर लवकरच मॉडेल जिल्हा होणार

पालघर : रस्ते बांधणे म्हणजे विकास नव्हे तर सर्वसामान्य शेतकरी व मनुष्य यांना चांगले दिवस आणणे म्हणजे विकास होय. आज जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासनासह अनेक उद्योजक, खाजगी संस्था पैसा द्यायला तयार असल्याने आपला जिल्हा विकसित करण्यास आता वेळ लागणार नाही. त्यामुळे पालघर जिल्हा हा महाराष्ट्रात मॉडेल जिल्हा करण्याच्या दृष्टीने माझे काम सुरू असून त्यासाठी सर्वांनी मला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री विष्णू सवरा यांनी कृषी दिनानिमित्त केले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस सर्व राज्यभर कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने संकुलामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती यांच्या हस्ते राज्य कृषिभूषण पुरस्काराकरिता नामांकन झालेले चंद्रकांत वर्तक, जिजामाता कृषिभूषण पुरस्काराकरिता नामांकन झालेल्या वसुंधरा नाईक, रूपाली बाबरेकर तसेच उद्यान पंडित पुरस्काराकरिता नामांकन झालेले प्रकाश राऊत, प्रकाश सावंत आदींसह जिल्हा पातळीवरील शेतीनिष्ठ शेतकरी व तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी इ.चा सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
आजचा तरुण शेतीकडे वळतोय, ही आपल्याकरिता मोठी अभिमानाची गोष्ट असल्याचे नमूद करून पूर्वी कृषी उत्पादनाबाबत स्वावलंबी नसणारा आपला देश कृषीमध्ये आलेल्या विविध तंत्रज्ञानामुळे निरनिराळी उत्पादने घेऊन स्वावलंबी बनत असल्याचे सवरा यांनी सांगितले.
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकून इतर शेतकऱ्यांनीही आपला विकास साधावा, असे जि.प. अध्यक्ष सुरेखा खेतले यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांनी आपल्या शेतीतून त्याचत्याच पिकांचे उत्पन्न घेण्याची पद्धत शेतकऱ्यांनी सोडून नवनवीन प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी, असे आवाहन केले. जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. प्रकाश पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात कृषी दिन सप्ताहाबाबच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली. (वार्ताहर)

Web Title: Palghar will soon be the model district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.