पालघर तहसीलला घेराव
By Admin | Updated: February 6, 2015 23:15 IST2015-02-06T23:15:30+5:302015-02-06T23:15:30+5:30
आम्ही जगायचे कसे, असा उद्वेगपूर्ण प्रश्न उपस्थित करीत केळवे येथील आदिवासी व फुदगी समाजाच्या शेकडो महिलांनी पालघर तहसील कार्यालयाला घेराव घातला.

पालघर तहसीलला घेराव
पालघर : रेशनकार्डावरून देण्यात येणाऱ्या धान्यासह रॉकेल, साखर आदी जीवनावश्यक वस्तूत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आल्याने आम्ही जगायचे कसे, असा उद्वेगपूर्ण प्रश्न उपस्थित करीत केळवे येथील आदिवासी व फुदगी समाजाच्या शेकडो महिलांनी पालघर तहसील कार्यालयाला घेराव घातला.
पालघरच्या तहसील विभागांतर्गत पुरवठा विभागाकडून प्रत्येक रेशनकार्डधारकाना ३५ किलो धान्य व आठ लीटर्स रॉकेलचा पुरवठा होत होता. परंतु, या पुरवठ्यामध्ये अचानकपणे कपात केली असून आता प्रति माणशी तीन किलो धान्य व एक लीटर रॉकेलचा पुरवठा होत असल्याने गरीब, आदिवासी व उपेक्षित समाजाच्या घटकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न जटील बनला आहे. त्यातच, हा पुरवठाही अनियमितपणे होत असल्याने कुटुंबाचा चरितार्थ चालविणेही कठीण बनले आहे. दिवसभर मेहनत करून तुटपुंज्या मजुरीवर जगायचे कसे, असा रास्त सवाल या महिलांनी तहसीलदार
चंद्रसेन पवार आणि पुरवठा अधिकारी संभाजी पवार यांच्यापुढे उपस्थित केला.
यावर तहसीलदार पवार यांनी महिलांना सांगितले की, शासनाकडूनच धान्यपुरवठा कमी व उशिराने झाल्याने वितरीत करण्यास उशीर झाला. तालुक्याला पूर्वी २८ टँकरने रॉकेलचा पुरवठा होत असताना आता तो १९ टँकरपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे रॉकेल पुरवठ्यात कपात करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे त्यांनी सांगितले.
(वार्ताहर)
४१ फेब्रुवारीपासून अन्नसुरक्षा कायद्यान्वये धान्याचा व तेलाचा पुरवठा शासनाकडून करण्यात आल्यानंतर धान्य वितरण व्यवस्था सुरळीत सुरू करण्यात येईल, असा विश्वास तहसीलदार पवार यांनी महिलांपुढे व्यक्त केला. या वेळी केळवा सरपंच भारती सावे, तुषार पाटील, संतोष भुरकुड यांनी या गरीब महिलांच्या व्यथा तहसीलदारांपुढे मांडल्या.