पालघर जिल्हा मतदानासाठी सज्ज
By Admin | Updated: October 15, 2014 04:04 IST2014-10-14T23:26:39+5:302014-10-15T04:04:08+5:30
पालघर जिल्हयातील सहा विधानसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून ७२ टक्के मतदारांना घरोघरी जाऊन मतदान स्लीपांचे वाटपही करण्यात आले आहे.

पालघर जिल्हा मतदानासाठी सज्ज
पालघर : पालघर जिल्हयातील सहा विधानसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून ७२ टक्के मतदारांना घरोघरी जाऊन मतदान स्लीपांचे वाटपही करण्यात आले आहे. जिल्हयातील २४७ झोन मधील २ हजार ३८ मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी दोन अतिरिक्त पोलीस अधिक्षकांअंतर्गत ४ हजार ४२७ पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
पालघर जिल्हयात पालघर, बोईसर, डहाणू, विक्रमगड, नालासोपारा व वसई अशा सहा मतदारसंघात एकुण १६ लाख ५३ हजार ९०४ मतदार असून पुरूष ८ लाख ६९ हजार ९९५ तर ७ लाख ८३ हजार ८३० महिला व इतर ७९ मतदार आहेत. एकुण २०३८ मतदान केंद्रावरील (प्रत्येक केंद्रावर १ केंद्राध्यक्षासह ३ मतदान अधिकारी १ शिपाई तर १ पोलीस शिपाई) १२ हजार ४०२ मतदान कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक झोनल अधिकाऱ्याला न्यायदंडाधिकाऱ्याचे हंगामी अधिकार देण्यात आले असून मतदान केंद्रापर्यंत साहित्यासह पोहचण्यासाठी ३३३ एस.टी बसेस, ४०३ जीप, १५ टेम्पो इ. कार्यरत ठेवण्यात आले आहेत. संपुर्ण पालघर जिल्हात एकही बुथ संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील वर्गात मोडत नसून या सहाही मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्था चोख रहावी यासाठी २ अतिरीक्त पोलीस अधिक्षकासह ८ उपविभागीय पोलीस अधिकारी, २६ पोलीस निरिक्षक, १४७ सहाय्यक पोलीस निरिक्षक, ४४२७ पोलीस, ७९ होमगार्ड व १ एस.आर.पी.एफ तुकडी व सीपीआरएफच्या ४ तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिली. त्याप्रमाणे १ हजार २८६ बंदुका, पिस्तूले पोलीसांकडे जमा करण्यात आल्या असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ८६८ लोकांवर सीआरपीसी कायद्यांतर्गत कलम १०७, १०९ व ११० अंतर्गत कारवाई करण्यात आली असून ४४५ जणांवर अजामीनपात्र वारंट बजवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.