पालघर जिल्हा संपर्कप्रमुखपदी तरे
By Admin | Updated: February 23, 2015 22:23 IST2015-02-23T22:23:17+5:302015-02-23T22:23:17+5:30
नव्याने साकार झालेल्या पालघर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांची नियुक्ती केली आहे.

पालघर जिल्हा संपर्कप्रमुखपदी तरे
ठाणे : नव्याने साकार झालेल्या पालघर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांची नियुक्ती केली आहे. पालघर हा ठाणे जिल्ह्याचा भाग होता तेव्हा एकनाथ शिंदे हे या एकसंध ठाणे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख अशी दोन पदे भूषवित होते. परंतु ठाण्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा नव्याने अस्तित्वात आल्यापासून तिथे संपर्कप्रमुख नव्हता. ती उणिव आता तरे यांच्यामुळे भरून निघाली आहे. पालघर जिल्ह्यात शिवसेनेचा एक आमदार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद, पालघर नगर पालिका आणि पंचायत समिती तसेच अन्य पंचायत समिती शिवसेनेचे सदस्य आहेत. तसेच जिल्हा परिषदेतही शिवसेनेचे संख्याबळ दुसऱ्या क्रमांकाचे आहे. त्यामुळे या जिल्ह्यात शिवसेनेच्या वाढीस भरपूर वाव आहे. येथे शिवसेनेची मजबूत बांधणी करण्यासाठीच तरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी ठाण्याचे महापौरपद तीनदा तर विधानपरिषदेची आमदारकी एक वेळा भूषविली आहे. संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सचिन पाटील, पालघर पंचायत समितीचे सभापती रवींद्र पागघरे, उपसभापती मनोज संखे. तरे यांचे शाल, श्रीफळ देऊन अभिनंदन क रण्यात आले. या वेळी शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, उपजिल्हाप्रमुख अरुण पाटील, सुधीर तामोरे, निलेश गंधे, भालचंद्र खोडके, माणिक म्हसके, तुळशीदास तामोरे, शुभांगी कुंटे, वैष्णवी राहणे, शीतल वेदपाठक, कीर्ती हावरे, सुशील चुरी, भारती कामडी, स्नेहा जाधव, प्र्रकाश केणे, गजानन पाटील, तुषार यादव आदी उपस्थित होते.