पालीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत
By Admin | Updated: August 14, 2014 00:25 IST2014-08-14T00:25:43+5:302014-08-14T00:25:43+5:30
सध्या शहरातील सर्वच ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी प्रचंड उच्छाद मांडला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे

पालीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत
पाली : सध्या शहरातील सर्वच ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी प्रचंड उच्छाद मांडला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पादचाऱ्यांपासून दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. तसेच मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला नागरिक वैतागले असून प्रशासनाने यांचा योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. पाली शहरातील प्रत्येक आळीत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे.
रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांवर भुंकणे, पाठलाग करणे, दुचाकी, चारचाकी वाहनांचा पाठलाग करणे तसेच दिवसा-रात्री विशेषत: बाजारपेठेतील गांधी चौक, ग. बा. वडेर हायस्कूल, सरकारी हॉस्पिटलजवळ, बल्लाळेश्वर मंदिर, एसटी स्टँड, विक्रम स्टँड आदी ठिकाणी रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
ठिकठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्यांनी ३ जणांचा चावा घेतला आहे. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र पाली येथे औषधोपचार करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी विनायक देशपांडे यांनी दिली तर पालीतील खाजगी दवाखान्यात आॅगस्ट महिन्यामध्ये साधारण १० जणांवर उपचार सुरू असल्याचे समजते. यामध्ये कुत्र्यांनी बालकांना सुद्धा चावे घेतले असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण झाले आहे. तरी प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)