मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर आठवडाभरात १० लाखांहून अधिक सायबर हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे, बँकिंग नेटवर्क्स आणि सरकारी पोर्टल्सना धोक्याचा इशारा देत सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे. हे फक्त हल्ले नाहीत, तर संघटित सायबर युद्धासारखी स्थिती असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र सायबर सेलच्या ‘इकोज ऑफ पहलगाम’ या अहवालानुसार, २३ एप्रिलपासून जवळपास १० लाख सायबर हल्ल्यांची देशभरात नोंद झाली आहे. यामागे सायबर गुन्हेगारांची मोठी टोळी असावी, असा संशय विभागाला आहे. दहशतवाद्यांच्या कटाचा हा भाग असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या टोळीने भारतीय सैनिकी शिक्षण संस्था, सैनिक कल्याण पोर्टल्स आणि अनेक सैनिकी शाळांच्या संकेतस्थळांना ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न केला आहे. यातील बहुसंख्य हल्ले उधळून लावण्यात सायबर पोलिसांना यश आले.
अशी आहे हल्लेखोरांची नवीन मोडस ऑपरेंडी
सायबर विभागाने ‘पहलगाम सायबर वॉरफेअर’ हा दुसरा अहवाल तयार केला आहे. या अहवालात सायबर हल्लेखोरांची नवीन मोडस ऑपरेंडी समोर आली आहे. यामध्ये ‘एपीटी ३६’ या नवीन गटाची माहिती मिळाली आहे. हा गट पाकिस्तानातून सक्रिय असल्याचा संशय आहे. त्यांनी आयपी ॲड्रेस बंद केले असून ते बल्गेरियामधून काम करत असल्याचे दिसून येत आहे. या टोळीने हुबेहूब सरकारी पत्र तयार केले आहे. त्यामध्ये त्यांनी मॉलवेअर लपवले आहे. यावर क्लिक करताच सर्व डाटा चोरी होऊ शकतो. हे वेगवेगळे ग्रुप एकमेकांना संपर्कात राहून हल्ले करत आहेत.
कशावर झाले हल्ले? : वेबसाइट डिफेसमेंट, कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम एक्सप्लॉयटेशन आणि कमांड अँड कंट्रोल (सी२). यापैकी सर्वाधिक हल्ले वेबसाइट डिफेसमेंटवर झाले आहेत.
कुठून झाले हल्ले?
सायबर हल्ले पाकिस्तान, मोरोक्को, मध्य पूर्वेतील देश आणि इंडोनेशियातून होत आहेत.
या हल्ल्यात सामील टोळीला विशिष्ट नाव देण्यात आले आहे. त्यातील ‘टीम इन्सेन पीके’ हा पाकिस्तानस्थित गट सर्वाधिक हल्ले करीत असल्याचा संशय आहे.
‘मिस्टेरियस टीम बांग्लादेश’ व इंडोनेशियातील ‘इंडो हॅक्स सेक्शन’ या गटांनीन भारतीय दूरसंचार डेटा प्रणाली व प्रशासकीय पोर्टल्सवर हल्ला केला.
हे एक प्रकारचे सायबर युद्ध आहे. या हल्ल्यातून देशाच्या आर्थिक व्यवस्थेला धोका पोहोचविण्याचा मेसेज देण्याचा प्रयत्न आहे. सायबर सुरक्षा ऑडिट करा, पासवर्ड अधिक सक्षम बनवा. तसेच सायबर सुरक्षा योग्य आहे की नाही याची खातरजमा करून घ्या.
यशस्वी यादव, प्रमुख, महाराष्ट्र सायबर विभाग