Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 13:45 IST

BMC Election Padu Display Units: मुंबई महापालिका निवडणुकीत मतदानासाठी नवीन पाडू (printing auxiliary display unit) मशीन ईव्हीएमला जोडले जाणार असल्याचे सांगत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केला.  

Printing Auxiliary Display Unit in BMC Election 2026: "निवडणूक आयोगाने आता पाडू (printing auxiliary display unit) नावाचे नवीन मशीन आणले आहे. ते उद्या सगळीकडे ठेवले जाणार आहे. ईव्हीएम बंद पडले तर हे मशीन वापरले जाणार आहे. पण, आयोगाने याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. याबद्दल आधी माहिती का दिली नाही?", असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केला. त्यानंतर आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी भूषण गगराणी यांनी पाडू मशीन दाखवत याबद्दल खुलासा केला आहे. 

पाडू (Printing Auxiliary Display Unit) मशीनबद्दल ऐनवेळी माहिती देण्यात आल्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या पाडू मशीनबद्दल काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. 

पाडू मशीनबद्दल आयुक्तांनी काय सांगितले?

राज ठाकरे यांच्याकडून आरोप करण्यात आल्यानंतर महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी भूषण गगराणी यांनी खुलासा केला आहे. 

"पाडू मशीन मुंबईमध्ये सरसकट वापरले जाणार नाही. काही अपवादा‍त्मक, आपातकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास हे मशीन वापरले जाईल. व्हीव्हीपॅटला पर्याय म्हणून गरज पडल्यावर हे मशीन वापरले जाणार आहे. यावेळी जी मतमोजणी होईल, ती कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट यांना सोबत जोडून करण्याचे आदेश आहेत. जर कंट्रोल युनिटचा डिस्प्ले काम करत नसेल, तर हे (पाडू) एक यंत्र आहे. हे पण कंट्रोल युनिटच आहे. तसेच आहे. ते बॅकअप म्हणजे पर्याय असणार आहे", असे गगराणी यांनी सांगितले. 

"पाडू मशीन ईव्हीएमला जोडले जाईल. बेल नावाच्या कंपनीने हे मशीन बनवले आहे. त्या कंपनीने सांगितले आहे की, याची गरज पडण्याची वेळ कमीच येईल. चाळीस युनिट आमच्यासाठी पाठवले आहेत. हे युनिट आरओकडे असेल. याची गरज कदाचित पडणार नाही, तरीही तातडीचा पर्याय म्हणून पहिल्यांदाच हे युनिट वापरले जाईल", अशी माहिती गगराणी यांनी दिली. 

पाडू मशीन काय आहे?

पाडू हे व्हीव्हीपॅटसारखं पेपर पावती देणारे यंत्र नाहीये, मतदान प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी वापरले जाऊ शकते. हे यंत्र ईव्हीएमला जोडण्यात येईल. कंट्रोल युनिट म्हणून हे यंत्र वापरले जाईल.

राज ठाकरे पाडू मशीनबद्दल काय म्हणाले?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना काही प्रश्न उपस्थित केले. "पाडू मशीन सगळीकडे ठेवले जाणार आहे. व्हीव्हीपॅट बंद पडलं, तर हे मशीन वापरले जाणार आहे. पण, याबाबत कोणतीही माहिती निवडणूक आयोगाने दिलेली नाही. ईव्हीएमला नवीन मशीन जोडण्यासंबंधी आधी माहिती का दिली नाही? नवीन मशीन राजकारण्यांना दाखवावंसही आयोगाला वाटले नाही. काय प्रकारचे राजकारण सुरू आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे", अशी भूमिका राज ठाकरेंनी आयोगाच्या निर्णयावर मांडली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai to use 'PADU' machines selectively after Raj Thackeray's anger.

Web Summary : Following Raj Thackeray's concerns about the new 'PADU' machines for BMC elections, Commissioner Gagrani clarified their limited, backup use only if EVMs malfunction. Forty units are available but may not be needed, he added.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६राज ठाकरेमतदानईव्हीएम मशीनभारतीय निवडणूक आयोग