Join us  

Oxygen: पालिकेच्या 12 रुग्णालयांत हाेणार ऑक्सिजन निर्मिती; महिन्याभरात उभारणार १६ प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:58 AM

४३ मेट्रिक टनचा साठा; महिन्याभरात उभारणार १६ प्रकल्प

मुंबई : ऑक्सिजनची मागणी वाढत असल्याने महापालिकेने आता स्वतः ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार १२ रुग्णालयांमध्ये एकूण १६ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्‍प येत्या महिन्याभरात उभारण्यात येणार आहेत. दररोज एकूण ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा तयार करण्यात येणार आहे. यामुळे काेराेना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार  आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. बाधित रुग्‍णांच्‍या फुप्‍फुसांना होणारा संसर्ग अधिक असल्याने अधिक क्षमतेने (लिटर प्रति मिनिट) ऑक्सिजन रुग्णांना पुरवावा लागतो. मात्र ऑक्सिजन उत्‍पादक,  वाहतूकदारांच्या क्षमता, ऑक्सिजन उत्‍पादन, पुरवठा व वाहतूक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या मर्यादा असल्याने मागणी व पुरवठा यांचा मेळ घालताना राज्य सरकार व पालिकेची कसरत होत आहे.

याचा फटका मुंबईलाही बसत असल्याने गेल्या काही दिवसांत खासगी, पालिका रुग्णालयांमधील ऑक्सिजन संपल्यावर रुग्णांना अन्य रुग्णालयात स्थलांतरित करावे लागत आहे. यामुळे यंत्रणेवर ताण वाढत असल्याने पालिकेच्‍या रुग्‍णालयांमध्‍ये स्‍वतःचे प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प उभारण्याचा निर्णय आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घेतला आहे.

आर्थिक खर्चात हाेणार बचतहे प्रकल्‍प किमान १५ वर्षे ते कमाल ३० वर्षे चालू शकतात. एकूण खर्च अंदाजे ९० कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. या सयंत्रातून निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनचा प्रति घनमीटर दर हा लिक्विड ऑक्सिजन दर इतकाच आहे. तर जम्बो सिलिंडरशी तुलना करता त्‍याच्‍या अर्ध्याहूनही कमी आहे. त्यामुळे पालिकेच्या आर्थिक खर्चात बचत होणार आहे.

यंत्रणेवरच ताण कमी हाेण्यास मदतपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्‍ये, कोविड केंद्रांमध्ये ऑक्सिजन निर्मिती करण्याचे प्रकल्प कायमस्वरुपी उभे राहिल्यास ऑक्सिजन सिलिंडर सांभाळण्याची व भरण्याची दगदग राहणार नाही. परिणामी यंत्रणेवरच ताण कमी होण्यास मोठी मदत मिळेल.- पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त 

येथे आहेत ऑक्सिजन प्रकल्पदोन वर्षांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयात प्रतिदिन सुमारे ५०० घनमीटर (क्‍युबिक मीटर) क्षमतेचा, तर वर्षभरापूर्वी जोगेश्‍वरीतील ट्रॉमा रुग्णालयामध्ये प्रतिदिन एक हजार ७४० घनमीटर (क्‍युबिक मीटर) क्षमतेचा प्रकल्‍प पालिकेने उभारला आहे. 

अशी हाेते निर्मिती

वातावरणातील हवा शोषून, पी.एस.ए. तंत्राचा वापर करून रुग्‍णांना ऑक्सिजन पुरवठा करताना, सर्वप्रथम संयंत्रांमध्‍ये योग्‍य दाबाने हवा कॉम्‍प्रेस केली जाते.  त्‍यानंतर ती हवा शुद्ध करण्‍यात येते. त्‍यामुळे हवेतील अशुद्ध घटक जसे की, धूळ, तेल, इंधन यांचे अतिसूक्ष्‍म कण, इतर अयोग्‍य घटक गाळून वेगळे केले जातात.या प्रक्र‍ियेनंतर उपलब्‍ध झालेली शुद्ध हवा ऑक्‍स‍िजन जनरेटरमध्‍ये संकलित केली जाते. शु द्ध हवेतून नायट्रोजन व ऑक्‍स‍िजन वेगळा करुन योग्‍य दाबासह स्‍वतंत्रपणे साठवला जातो. तेथून तो पाइपद्वारे रुग्‍णांपर्यंत पोहोचवला जातो.

टॅग्स :ऑक्सिजनमुंबई महानगरपालिका