गोवंश हत्याबंदीविरोधात ओवैसी
By Admin | Updated: March 25, 2015 02:23 IST2015-03-25T02:23:34+5:302015-03-25T02:23:34+5:30
गोवंश हत्याबंदी कायद्याला विरोध करत खाटीक आणि कत्तलखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांनी मंगळवारी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला.

गोवंश हत्याबंदीविरोधात ओवैसी
मुंबई : गोवंश हत्याबंदी कायद्याला विरोध करत खाटीक आणि कत्तलखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांनी मंगळवारी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला. गोहत्येचे समर्थन करत असतानाही गोवंश हत्याबंदीचा कायदा करून सरकारने लाखो कामगारांना बेरोजगार केल्याचा आरोप सर्व श्रमिक संघाने केला आहे.
सरकारने निर्णय मागे घेतला नाही, तर उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती संघाचे उपाध्यक्ष मिलिंद रानडे यांनी दिली. दरम्यान, एमआयएम पक्षाचे प्रमुख नेते अकबरुद्दीन ओवैसी या आंदोलनात सामील होणार असल्याचे कळाले. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला आंदोलनात सामील होण्यासाठी निमंत्रित केले नसल्याने ओवैसी यांना नकार कळवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
गोवंश हत्याबंदीला एमआयएमचा विरोध असल्याचे आमदार वारिस पठाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पठाण यांनी सांगितले की, गाय माता असल्याने तिचा आदर सर्वच समाजाने करायला हवा. मात्र गोवंश हत्याबंदीमुळे परंपरेने या धंद्यात असलेला कुरेशी समाज देशोधडीला लागला आहे. त्यामुळे पक्षातर्फे लवकरच मोर्चा काढण्यात येईल. त्यात ओवैसीही सामील होतील.
(प्रतिनिधी)