Join us

कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 23:28 IST

आसनगाव, कर्जत आणि अंबरनाथ लोकल खोळंबल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि सायनदरम्यान ओव्हर हेड वॉर तुटल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएस एमटी) कडे जाणाऱ्या (अप) जलद मार्गावरील  वाहतूक ठप्प झाली. रात्री १०.१० वाजता ही घटना घडली. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकलने घरी परतणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला. 

मध्य रेल्वेच्या विद्युत अभियांत्रिक पथकाने तातडीने ब्लॉक घेत दुरुस्ती काम सुरू केले. ब्लॉक वेळेत काही जलद मार्गवरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. यामुळे आसनगाव, कर्जत आणि अंबरनाथ लोकल खोळंबल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती काम सुरू होते, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

ओव्हर हेड वायर तुटल्याने अनेक रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी उसळली होती. याचा प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. रविवारी मेगाब्लॉकमध्ये रेल्वे रुळांसह सिग्नल आणि ओव्हरहेड वायरची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. त्यामुळे आठवडाभर कोणताही त्रास होणार नाही अशी प्रवाशांना अपेक्षा असते. अशाच ओव्हर हेड वायर तुटणे या सारख्या घटनांमुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :मध्य रेल्वे