परराज्यातील ट्रॉलर्सचा उच्छाद
By Admin | Updated: May 29, 2014 23:35 IST2014-05-29T23:35:39+5:302014-05-29T23:35:39+5:30
या बंदीचा फायदा उचलीत कोकणासह परराज्यातील ट्रॉलर्सनी या भागात येऊन उच्छाद मांडला आहे

परराज्यातील ट्रॉलर्सचा उच्छाद
हितेन नाईक, पालघर - मत्स्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील अंडीधारे मासे, त्यांच्या पिल्लांची वाढ होत त्या अनुषंगाने मत्स्यसाठेही वाढावेत यासाठी पालघर, डहाणू, वसई, जाफराबाद या भागातील हजारो मच्छीमारांनी उत्स्फूर्तपणे १५ मेपासूनच मासेमारी बंद केली आहे. या बंदीचा फायदा उचलीत कोकणासह परराज्यातील ट्रॉलर्सनी या भागात येऊन उच्छाद मांडला आहे. या प्रकाराकडे पालघरचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी वेलारासू यांची भेट घेत कारवाईची मागणी केली. ‘‘मासा टिकला तरच मच्छीमार टिकेल’’ या वास्तविकतेचा स्विकार करीत मत्स्य दुष्काळाच्या खाईत होरपळणार्या मच्छीमारांनी प्रसंगी आपल्या पोटाला चिमटा काढीत शासन निर्णयाप्रमाणे १० जूनपासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी सुरू होत असताना २५ दिवसाआधीपासूनच (१५ मे) बंदी करीत असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे आजही वसई, उत्तन, अर्नाळा, दातिवरे, एडवण, कोरे, केळवा, वडराई, सातपाटी, मुरबे, नवापुर, उच्छेळी, दांडी, डहाणू इ. भागातील हजारो मच्छीमारांनी आपल्या बोटी बंद केल्या आहेत. या बंदीचे स्वागत गुजरात राज्यातील जाफराबाद, दमण भागातील मच्छीमारांनी करून त्यांनीही आपल्या बोटी बंद ठेवल्या आहेत. या निर्णयाचे स्वागत शासनाने करून महाराष्टÑ मासेमारी अधिनियमन कायद्यात बदल करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे असताना ती उचलली जात नाहीत. उलट मत्स्य व्यवसाय खाते मात्र ट्रॉलर्सद्वारे सुरू असलेल्या बेकायदेशीर मासेमारीवर कारवाई करण्यास असमर्थता व्यक्त करीत आहे. किनारपट्टीवरून समुद्रात बारा नॉटीकल मैलपर्यंत ट्रॉलर्सने मासेमारी करण्यास कायद्याने बंदी असताना आज शेकडो ट्रॉलर्स पालघर, वसई, डहाणू तालुक्यातील समुद्रात पारंपारीक मासेमारी करणार्या मच्छीमारांच्या कवींचे नुकसान करीत मासेमारी करीत आहेत. त्यांच्यावर सहा. मत्स्य व्यवसाय विभाग, पालघरचे रविंद्र वायडा यांनी कारवाई करणे अपेक्षीत असताना आमच्याकडे गस्ती नौका नाही (यांची गस्तीनौका किनार्यावर सडत पडली आहे.)अशी ढोबळ उत्तरे त्यांच्याकडून दिली जात आहेत. परंतु गस्तीनौका चालू असताना आतापर्यत किती ट्रॉलर्सवर यांनी कारवाई केली आहे याचा शोध घेतल्यास त्यांची बेफीकिरी समोर येईल, असे मच्छीमार सांगत आहेत.