Join us  

आरेतील पुनर्रोपित झाडांपैकी 60 टक्क्यांहून अधिक झाडे मृतावस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 1:20 AM

मेट्रो-३ फटका : पर्यावरणप्रेमींचा दावा; पाहणीतून वास्तव आले समोर

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पात जी झाडे तोडली गेली; त्या झाडांच्या चार ते पाच पट अशी लाखो झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत, असा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून केला जात असतानाच दुसरीकडे या दाव्यात तथ्य नसल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पांतर्गत आरेमध्ये पुनर्रोपित करण्यात आलेल्या झाडांपैकी ६० टक्क्यांहून अधिक झाडे मृत झाल्याचे आरे येथील आंदोलकांचे म्हणणे आहे.मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीतर्फे सोमवार ते बुधवार या कालावधीमध्ये पुनर्रोपित झाडांची पाहणी करण्यात आली होती. आरे परिसरात मेट्रो ३ प्रकल्पांतर्गत १ हजार ६० झाडे पुनर्रोपित करण्यात आली होती. मंगळवारी युनिट २०, गट २०, गट २५ आणि २६, पिकनिक पॉइंटच्या समोर, मिठी नदीच्या परिसरातील आरेमधील जागा, दुर्गानगर आणि गट ३२ या ठिकाणांना भेट देऊन झाडांची पाहणी करण्यात आली. या वेळी ६० टक्क्यांहून अधिक पुनर्रोपित झाडे मृतावस्थेत असल्याचे पर्यावरणप्रेमींना आढळून आले. पाने गळून पडलेली, फांद्या कापलेल्या पुनर्रोपित झाडांची खोडे या परिसरात अत्यंत दयनीय अवस्थेत पाहायला मिळाली. मृतावस्थेतील झाडांची संख्या ६८० हून अधिक असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रवक्ताने सांगितले की...मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या निर्देशानुसार मोठ्या प्रमाणावर नागरी वृक्षारोपण व पुनर्रोपणाची मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने २३ हजार ८४६ नवीन झाडे लावली. तर १ हजार ५८२ झाडे पुनर्रोपित करण्यात आली. शहरी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करीत केलेल्या वृक्षलावगडीपैकी ९७ टक्के झाडे जगली आहेत. तर पुनर्रोपित केलेली ३६.२ टक्के झाडे (५७२ झाडे) जिवंत आहेत. याशिवाय आम्ही वृक्षारोपण व पुनर्रोपित झाडे लावण्यास व देखभाल करण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहोत.मेट्रो ३ प्रकल्पासाठी कुलाब्यापासून ते आरे कॉलनीपर्यंत अनेक ठिकाणी झाडे तोडण्यात आली. काही झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले तर काही झाडे तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून लावण्यात आली. सोमवार ते मंगळवारपर्यंत आरे परिसरातील पुनर्रोपित झाडांचा आढावा घेण्यात आला असता निम्म्याहून अधिक झाडे मृतावस्थेत आढळल्याचा दावा ‘आरे वाचवा’ चळवळीतील पर्यावरणप्रेमींनी केला आहे.कांजूरमार्ग येथील नेव्ही कॉलनीमध्ये नव्याने झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले असून बुधवारी करण्यात आलेल्या पाहणीत २०० झाडे सुस्थितीत असल्याचे दिसून आले. परंतु मानखुर्द येथील ३२५ रोपांची लागवड करण्यात आली असून त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मुंबईतल्या वेगवेगळ्या ३१ ठिकाणी मेट्रो ३ प्रकल्पाकडून आजपर्यंत १ हजार ५३४ झाडे पुनर्रोपित करण्यात आली. त्यापैकी ९६० झाडे मृत; म्हणजेच ६१ टक्के झाडे मृतावस्थेत आहेत. पुनर्रोपित करण्यात आलेल्या झाडांचे मृत होण्याचे प्रमाण वाढत असून जानेवारी २०१८ मध्ये हे प्रमाण ४२ टक्के होते. आता ते ६१ टक्क्यांवर पोहोचले आहे, असे पर्यावरणप्रेमी झोरू बथेना यांनी सांगितले.680 एकूण पुनर्रोपित झाडे64% मृत झाडेमिठी, डेपो प्लॉट : ४६१ पैकी ३१० मृतयुनिट क्रमांक २० : ३९९ पैकी २३५ झाडे मृतगेट क्रमांक ३० : ८१ पैकी ५१ झाडे मृतपिकनिक पॉइंट : ४१ पैकी २९ झाडे मृतगेट क्रमांक २५ आणि २६ : ६४ पैकी ४६ झाडे मृतदुर्गानगर : १० पैकी ९ झाडे मृतगेट क्रमांक ३२ : ४ पैकी ०.

टॅग्स :मेट्रो