३२ ठिकाणी भाजपाची सेनेवर मात

By Admin | Updated: October 20, 2014 02:24 IST2014-10-20T02:24:15+5:302014-10-20T02:24:15+5:30

अशा भाऊबंदकीच्या लढायांमध्ये तब्बल ६४ मतदारसंघांत या पक्षांमध्ये थेट लढती झाल्या.

Over 32 BJP defeats the army | ३२ ठिकाणी भाजपाची सेनेवर मात

३२ ठिकाणी भाजपाची सेनेवर मात

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेना-भारतीय जनता पार्टी ची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्याने या चारही प्रमुख पक्षांनी स्वबळ आजमावत बहुतेक सर्वच मतदारसंघांत परस्परांविरुद्ध उमेदवार रिंगणात उतरविले. अशा भाऊबंदकीच्या लढायांमध्ये तब्बल ६४ मतदारसंघांत या पक्षांमध्ये थेट लढती झाल्या.
यापैकी ५३ मतदारसंघांमध्ये शिवसेना व भाजपा यांच्यात तर ११ मतदारसंघांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकांच्या मतांसाठी आपसात स्पर्धा झाली. निवडणूक निकालांचे विश्लेषण करता असे दिसते की, ५३ पैकी तब्बल ३२ मतदारसंघांत भाजपाने शिवसेनेवर मात केली तर २१ मतदारसंघांत शिवसेनेने भाजपाला चितपट केले. तसेच आपसात लढती झालेल्या ११ पैकी चक्क १० मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसवर बाजी मारली आणि काँग्रेस फक्त एकाच ठिकाणी राष्ट्रवादीला पराभूत करण्यात यशस्वी ठरली.
युती आणि आघाडीत बिघाड झाला नसता तर या सर्व मतदारसंघांमध्ये या भाऊबंदकीच्या लढाया झाल्याच नसत्या हे उघड आहे. तसेच युती तुटली नसती तर शिवसेना-भाजपाने एकत्रितपणे कदाचित दोन तृतियांश बहुमताचा पराक्रमही केला असता, असे निकालांवरून दिसते. यावरून असेही दिसते की, दीर्घकाळ नांदणारी दोन घरे फुटण्याचा फटका युतीपैकी शिवसेनेला व आघाडीतील काँग्रेसला सोसावा लागला.
ज्या मतदारसंघांत शिवसेना व भाजपा यांच्यात सरळ लढती झाल्या ते ५३ मतदारसंघ असे: अंबरनाथ, अंधेरी (पू.), औरंगाबाद (प.), भांडुप (प.), भिवंडी (प.), भिवंडी (ग्रामीण), बोरिवली, चंद्रपूर, चारकोप, चिंचवड, कुलाबा, दहिसर, देवळाली, डोंबिवली, गंगापूर, घाटकोपर (पू.), घाटकोपर (प.), गोरेगाव, हडपसर, जळगाव शहर, जोगेश्वरी (पू.), कालिना, कल्याण (प.), कर्जत जामखडे, कोपरगाव, कोपरी-पाचपाखाडी, कोथरुड, कुर्ला, लोहा, मागठाणे, मलबार हिल, मालेगाव (बाह्य), मुक्ताईनगर, नांदेड (दक्षिण), नाशिक (पू.), नाशिक (पश्चिम), ओवळा माजिवडे, पवर्ती, राहुरी, रामटेक, रत्नागिरी, सावंतवाडी, सिंदखेड राजा, सिन्नर, शीव कोळीवाडा, ठाणे, वडगाव शेरी, वांद्रे (प.), विक्रमगड, विलेपार्ले, वणी, वरोरा, वाशिम आणि यवतमाळ.
अशाच प्रकारे अक्कलकुवा, इंदापूर, जिंतूर, कराड (उत्तर), कोरेगाव, माढा, मालेगाव (मध्य), नवापूर, फलटण, तुळजापूर आणि वाई या ११ मतदारसंघांत काँग्रेस व राष्ट्रवादी या पूर्वाश्रमीच्या मित्रांमध्येसरळ लढती झाल्या. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Over 32 BJP defeats the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.