सेतू कार्यालयाचे आऊटसोर्सिंग
By Admin | Updated: December 2, 2014 00:43 IST2014-12-02T00:43:33+5:302014-12-02T00:43:33+5:30
ठाणेकरांना चांगली आणि वक्तशीर सुविधा देता यावी म्हणून प्रशासनाने आता आऊटसोर्सिंग अर्थात बाहेरील संस्थांच्या सेवांचा वार करण्याचे निश्चित केले आहे.
सेतू कार्यालयाचे आऊटसोर्सिंग
ठाणे : ठाणेकरांना चांगली आणि वक्तशीर सुविधा देता यावी म्हणून प्रशासनाने आता आऊटसोर्सिंग अर्थात बाहेरील संस्थांच्या सेवांचा वार करण्याचे निश्चित केले आहे. यानुसार, नागरी सुविधा केंद्रातील सर्व कामेही या तंत्राने करण्याचा पालिकेचा निर्धार असूून त्यासाठी ठाणेकरांच्या खिशाला थोडासा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. समाधानाची बाब म्हणजे सर्वच भार ठाणेकरांवर न देता महापालिका यातील थोडा भार उचलणार आहे. ठाणेकरांना चांगल्या सेवा व सुविधा देण्यात आजही महापालिका कमी पडत आहे. एखाद्या कामासाठी वारंवार खेटे घालावे लागत आहेत. कारण सध्या पालिकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. जेवढे अधिकारी अथवा कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत, तेवढे ही नव्याने भरले जात नाहीत़ त्यामुळे आहे त्याच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अतिरिक्त कामाचा बोजा सहन करावा लागत आहे. त्यामुळे याचा परिणाम पालिकेच्या सेवांवर होताना दिसत आहे. सेतू कार्यालयामध्ये तर विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत असून महिन्याला ही संख्या ३ ते ५ हजारांवर जाते. तेथेही कर्मचाऱ्यांची वानवा आहे. तसेच शासकीय सेवा असल्याने सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेतच ती उपलब्ध असते.
६ वाजल्यानंतर एखादा नागरिक आला तरी त्याला परत जावे लागते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चांगली आणि जास्त वेळ सेवा देता यावी, या उद्देशाने सेतू कार्यालयाचे आऊटसोर्सिंग करण्याचा पालिकेचा विचार सुरू आहे. आऊटसोर्सिंग झाल्यानंतर कार्यालयीन वेळेनंतरसुद्धा नागरिकांना विविध प्रकारचे दाखले सहज उपलब्ध होतील. तसेच पालिकेच्या यंत्रणेवरील ताणदेखील कमी होणार आहे. पालिकेकडून नाममात्र दारामध्ये दाखले उपलब्ध होत असल्याने आऊटसोर्सिंग झाल्यानंतर नागरिकांवर खर्चाचा अधिकचा बोजा पडण्याची शक्यता आहे. परंतु, यातील काही भार हा पालिका उचलण्यास तयार आहे.
पासपोर्ट आॅफिसच्या व्हीएफएस ग्लोबल या कंपनीने पालिकेकडे विचारणा केली असून नाव पालिकेचे मात्र कार्यालयापासून इतर सर्व यंत्रणा, कर्मचारीवर्ग या कंपनीचे असणार आहे. कोणता दाखला किती वेळेत मिळणार, याची अचूक माहिती अर्ज करणाऱ्या नागरिकांना मिळणार असून यामुळे त्यांचा वेळदेखील वाचणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
(प्रतिनिधी)