शाळाबाह्य मुलांचे नोव्हेंबरमध्ये होणार फेरसर्वेक्षण

By Admin | Updated: September 3, 2015 02:10 IST2015-09-03T02:10:00+5:302015-09-03T02:10:00+5:30

राज्यातील शाळाबाह्य मुलांची संख्या शोधून काढण्याकरिता अलीकडेच झालेल्या सर्वेक्षणात ही संख्या जेमतेम ५० हजार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याबाबत स्वयंसेवी

Out-of-school children will be reviewed in November | शाळाबाह्य मुलांचे नोव्हेंबरमध्ये होणार फेरसर्वेक्षण

शाळाबाह्य मुलांचे नोव्हेंबरमध्ये होणार फेरसर्वेक्षण

मुंबई : राज्यातील शाळाबाह्य मुलांची संख्या शोधून काढण्याकरिता अलीकडेच झालेल्या सर्वेक्षणात ही संख्या जेमतेम ५० हजार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याबाबत स्वयंसेवी संघटनांनी नापसंती व्यक्त केल्याने नोव्हेंबर महिन्यात राज्यात पुन्हा शाळाबाह्य मुलांचे मेगा सर्वेक्षण करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
राज्याच्या शिक्षण विभागाने अलीकडेच आपल्या कर्मचारी वर्गाच्या मदतीने एका दिवसात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले होते. त्यावेळी शाळाबाह्य मुलांची संख्या जेमतेम ५० हजार असल्याचे स्पष्ट झाले होते. मागील सरकारच्या काळात झालेल्या सर्वेक्षणात ही संख्या पावणेदोन लाखांच्या घरात होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शाळाबाह्य मुलांची संख्या कशी कमी झाली, असा सवाल स्वयंसेवी संस्थांनी उपस्थित केला होता.
राज्यातील शाळाबाहय मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण विभाग आणि स्वयंसेवी संघटना यांची एकित्रत राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल. समितीमध्ये शिक्षण विभागाचे दोन-तीन अधिकारी तसेच स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. ही नव्याने नियुक्त करण्यात येणारी समिती येत्या नोव्हेंबर मध्ये राज्यामधील जिल्हयानिहाय शाळाबाह्य मुलांचे मेगा सर्वेक्षण सुरु करील.
राज्यातील शाळाबाहय मुलांच्या सर्वेक्षणबाबत शालेय शिक्षण मंत्री तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. या बैठकीला स्वयंसेवी संस्था, संघटना,शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्वेक्षण अधिक प्रभावीपण आणि परिणामकारक पध्दतीने करण्यात येईल याबाबतही चर्चा करण्यात आली.
शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या कामामध्ये वीटभट्टी कामगार, उसतोडणी कामगार, दगड-खाणी मध्ये काम करणारे मजूर आदी कामगार व मजूरांच्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण प्रामुख्याने करण्यात येईल.या सर्व मुलांना प्रथम शाळेत आणण्यात येईल आणि त्यांना शिक्षण देण्यात येईल. तसेच ज्या राज्यामध्ये ज्या खाणी नोंदणीकृत नाही अशा खाणी गुगल मॅपिंगच्या सहाय्याने शोधून काढण्यात येतील आणि तेथे काम करणा-या मजूरांच्या मुलांचे सर्वेक्षण करण्यात येईल असेही तावडे यांनी सांगितले, काही कामगारांची मुले ही विदर्भामधून छत्तीसगडमध्ये जातात, तसेच छत्तीसगडमधील मुलेही आपल्या पालकांसमेवत विदर्भात येतात. अशा मुलांना पुन्हा शाळेत दाखल केले जाईल. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Out-of-school children will be reviewed in November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.