नाटय़गृह नव्हे.. हे तर आमचे दुसरे घर!
By Admin | Updated: August 6, 2014 01:05 IST2014-08-06T01:05:37+5:302014-08-06T01:05:37+5:30
चार घटका मनोरंजनासाठी लोक तेथे येतात, हसतात, रडतात, खूश तर कधी नाराज होतात.

नाटय़गृह नव्हे.. हे तर आमचे दुसरे घर!
मुंबई : चार घटका मनोरंजनासाठी लोक तेथे येतात, हसतात, रडतात, खूश तर कधी नाराज होतात. भावभावनांचा हा कल्लोळ रोज नव्याने पाहण्याची सवय लागलेल्या निर्जीव भिंतींच्या नाटय़गृहाशी तसे कोणाचे नाते ते काय? मात्र पार्लेकरांच्या आयुष्यात स्वत:च्या राहत्या घराच्याही पलीकडचे, जिव्हाळ्याचे नाते पाहून दीनानाथ नाटय़गृहाच्या नवे रूपडे लाभलेल्या भिंतींनीही भरून आले असावे!
गेली अडीच वर्षे हे नाटय़गृह महापालिकेच्या कृपेने बंद होते. कोर्टाच्या तारखा पडाव्यात तसे हे नाटय़गृह कधी सुरू होणार याच्या तारखांवर तारखा पडत होत्या. अखेर येऊ घातलेल्या निवडणुकांचे निमित्त झाले आणि हे नाटय़गृह पार्लेकरांसाठी सुरू झाले. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी पार्लेकरांनी ‘मुंबई 57’ कार्यक्रमाचे आयोजन केले. (57 हा पाल्र्याचा पिनकोड नंबर आहे!) कल्पकतेने याच्या आयोजनात भाग घेतला तो विनीत गोरे, मंदार कर्णिक आणि प्रसाद महाडकर यांच्यासह पाल्र्यातल्या तब्बल 15 संस्थांनी, आणि हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी पाल्र्यातले सगळे हुज हु जातीने हजर राहिले. पार्लेकर संगीत रजनी नावाने सुरू झालेला कार्यक्रम संपला तेव्हा पार्लेकरांना पहाट झाल्याचे जाणवले..!
अनेकांनी या वेळी अनेक आठवणी जागवल्या. माधवराव खाडिलकर म्हणाले, या नाटय़गृहातला पहिला प्रयोग ‘सागरा प्राण तळमळला’ या नाटकाचा होता. ज्यात सावरकरांची भूमिका करण्याचे भाग्य मला मिळाले होते आणि त्यांच्या पत्नीची भूमिका आशा खाडिलकर यांनी पार पाडली होती. आज त्याच नाटय़गृहात सत्कार स्वीकारताना आपण भारावून गेलो, असेही त्यांनी सांगितले. जीवनगाणीचे प्रसाद महाडकर म्हणाले, आपल्या संस्थेचा पहिला प्रयोग या नाटय़गृहात केला त्या वेळी दीनानाथचे भाडे 75क् रुपये होते. तेवढे पैसेदेखील आपल्याकडे नव्हते. शशिकांत पाटकर यांनी ते भाडे भरले म्हणून आपण आजचा दिवस पाहू शकतो, असे प्रसाद यांनी सांगितले. तर झाकीर हुसेनच्या कार्यक्रमात 5 हजार लोकांना मोफत वडापाव खाऊ घालणा:या पराग साठे यांनादेखील गाणो गायला लावणा:या मंदारने आज मात्र वडा मोफत नसून कार्यक्रम मोफत आहे, असे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
शशिकांत पाटकर आणि नगरसेविका शुभदा पाटकर यांच्या पुढाकाराने पार पडलेला हा आनंद सोहळ रंगला तो विरोधी पक्षनेते विनोद तावडे, उद्योजक दीपक घैसास, लीलावतीचे शिरीष गानू, पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे उपाध्यक्ष विनय जोग, कार्यवाह अनिल गानू, डहाणूकर महाविद्यालयाच्या प्राचार्या माधवी पेठे, केशवसृष्टीच्या अध्यक्षा डॉ. अलका मांडके, अभिनेते मनोज जोशी, पुष्कर श्रोत्री अशा अनेक मान्यवर पार्लेकर मंडळींमुळे.
फुलांची परडी आणि पुलं
दीनानाथमध्ये गेली 35 वर्षे बोर्ड रंगवणारे व रांगोळीत तरबेज असलेल्या तुकाराम जाधव यांचीदेखील या वेळी आवजरून आठवण काढली गेली. नीला रवींद्र यांनी किस्सा सांगितला. एकदा पु.ल. देशपांडे यांचा सत्कार करायचे ठरले. काही तरी वेगळे करायचे म्हटल्यावर तुकारामनी फुलांची परडी आकाशातून स्टेजवर आणण्याची कल्पना मांडली. परडी स्टेजवर आली आणि पुलं म्हणाले, आज फुलांची परडी वरून खाली आणलीत.. उद्या आम्हालाच परडीत बसवून वरती नेईल हा तुकाराम..
सहभागी संस्था व त्यांचे प्रमुख :
प्रथमेश कलाकेंद्र - नीला रवींद्र, हृदयेश आर्ट्स-अविनाश प्रभावळकर, सोहम प्रतिष्ठान - विनित गोरे, शेफाली-अनिल बेलसरे, जीवनगाणी - प्रसाद महाडकर, उत्तुंग - माधवराव खाडिलकर, स्वर आर्ट्स - किरण शिंदेकर, संवेदना - संतोष जोशी, सूत्रधार - स्वाती हर्डीकर, सुरश्री-अभिजित सावंत, स्वरगंधार - मंदार कर्णिक, म्युङिाकलर -राजेश सुब्रमण्यम, स्वरविकास - विकास भाटवडेकर, श्री चॅरिटेबल ट्रस्ट - श्रीनिवास गोगटे, हॅपी लकी एंटरटेनमेंट -संजय महाले. (प्रतिनिधी)
बाळासाहेबांना दिली चांदीची वाघनखे
एकदा एका कार्यक्रमाच्या आयोजनात अनेक अडचणी येत होत्या म्हणून नीला रवींद्र बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेल्या. त्यांना म्हणाल्या, आमच्या प्रथमेशतर्फे कार्यक्रम होतोय आणि अनेक अडचणी येत आहेत. काही तरी मदत करा. त्यावर बाळासाहेबांनी सांगितले, ‘प्रथमेश आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने’ अशी पाटी लाव.. आणि तशी पाटी लावताच सगळ्या अडचणी दूर झाल्या. त्याच कार्यक्रमात बाळासाहेबांना चांदीची वाघनखे भेट दिली. त्या वेळी ते म्हणाले होते, ही नखं मी कपाटात ठेवून देणार आहे कारण अजून कोणासाठी वापरायची हे ठरवलेले नाही.. या अशा किश्श्यांनी दीनानाथ रात्री उशिरार्पयत रंगून गेले.
गाणारे पार्लेकर : या कार्यक्रमात अर्चना गोरे, सोनाली कर्णिक, सरिता राजेश, योगिता चितळे, यशोदा बुधकर, ऋषीकेश रानडे, प्राजक्ता रानडे, निहार-संगीता-किरण शेंबेकर, अभिजित सावंत, पराग साठे, आनंद सावंत, विकास भाटवडेकर, अपर्णा नागरकट्टी या पार्लेकर मंडळींनी काल आपल्या गळ्याची जादू दाखवून दिली. तर पाल्र्यात सूत्रसंचालन करणारे काही कमी नाहीत हे अनिल हर्डीकर, स्वाती वाघ, समिरा गुजर जोशी, विनीत गोरे या चौघांनी दाखवून दिले.