आमचं गणेशोत्सव मंडळ भारी आहे..!
By Admin | Updated: September 19, 2015 04:30 IST2015-09-19T04:30:47+5:302015-09-19T04:30:47+5:30
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने विराट रूप घेतले आहे. एकट्या मुंबईत १२ हजार मंडळांमार्फत गणेशोत्सव साजरा केला जातो.

आमचं गणेशोत्सव मंडळ भारी आहे..!
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने विराट रूप घेतले आहे. एकट्या मुंबईत १२ हजार मंडळांमार्फत गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यात प्रत्येक मंडळ आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचवेळी राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने अनेक मंडळांनी दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा निर्धार केला आहे. काही मंडळांनी आकर्षक देखावे उभारून गणेशभक्तांच्या डोळ््यांचे पारणे फेडले आहे. काही मंडळांनी सेलीब्रिटींना मंडळातील कार्यक्रमात सामील करून घेत उत्तम कार्यक्रमांची मेजवानी देण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील गणेशोत्सवाने मुंबई गजबजली आहे. पहिल्या दिवसापासूनच मंडपांमध्ये सेलीब्रिटींसह भाविक गर्दी करू लागले आहेत. अशा मोजक्या मंडळांच्या विशेष आकर्षणाबाबत...
काळाचौकीचा महागणपती
काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाने हीरकमहोत्सवानिमित्त यंदा ‘टेंपल रन’ या मोबाइल गेमची प्रतिकृती साकारली आहे. ८५ बाय ३० चौरस फूट जागेवर उभारलेला हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तही गर्दी करीत आहेत. देखाव्यामध्ये शिरल्यावर काळ््याकुट्ट अंधार असलेल्या डोंगरदऱ्यांमधून वाट काढत नैसर्गिक झऱ्यांचा आनंद घेत महागणपतीचे दर्शन घेण्याची संकल्पना मंडळाने सत्यात उतरवली आहे. शिवाय दानपेटीत जमा होणारी सर्व रक्कम यंदा मंडळाने दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून ‘नाम’ फाउंडेशनला देण्याचा निर्णय घेतला आहे. किमान २ लाख रुपये देण्याची मंडळाची इच्छा आहे. मात्र दानपेटीत कमी रक्कम जमा झाल्यास कमी पडणारी रक्कम मंडळ भरणार असल्याचे पदाधिकारी विजय लिपारे यांनी सांगितले.
लालबागचा राजा : मुंबईतील सर्वाधिक प्रसिद्ध मंडळ म्हणून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळच्या म्हणजेच लालबागच्या राजाची ख्याती आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी २१ लाख बेल्जियम काचांच्या तुकड्यांपासून साकारलेला शिशमहाल यंदाचे मंडळाचे मुख्य आकर्षण आहे. शिवाय दुष्काळग्रस्तांसाठी मंडळाने मुख्यमंत्री निधीत २५ लाख रुपयांचा धनादेश नुकताच सुपुर्द केला. गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत लाखो भक्तांसोबत शेकडो सेलीब्रिटी राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात.
चिंचपोकळीचा चिंतामणी
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदा ९६वे वर्ष आहे. राज्यात असलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्य दानपेटीशेजारी एक मदतपेटी ठेवली आहे. या पेटीत जमा होणारी सर्व रक्कम दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे. गणेशभक्तांनी चिंतामणीसाठी हार आणण्याऐवजी तेच पैसे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावे, असे आवाहनही मंडळाचे सचिव महेश पेडणेकर यांनी केले आहे. ज्येष्ठ सिने अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनाही आवाहनासाठी मंडळाने आमंत्रित केल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.
अंधेरीचा राजा
आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. विशेष आकर्षण म्हणून गुजरातच्या अंबाजी मंदिराची प्रतिकृती मंडळाने साकारली आहे. सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी तयार केलेला मोठा लाडू आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीची डिझाइनर सई सुमन यांनी गणपतीसाठी धोतर आणि शाल तयार केली आहे.
‘विश्वाचा राजा’ : ६१ वर्षांची परंपरा असलेले जीएसबी सेवा मंडळ हे मुंबईतील सर्वाधिक श्रीमंत मंडळ म्हणून ओळखले जाते. बेटी बचाओ बेटी पढाओ, पाणी वाचवा आणि स्वच्छ भारत या तीन गंभीर विषयांवर मंडळाकडून जनजागृती करण्यात येत आहे. हिरे, सोने आणि चांदीने मढवलेली मूर्ती मंडळाचे विशेष आकर्षण आहे.