मुंबई : संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ या संस्थेची १४ मार्चला निवडणूक होत आहे. ‘एशियाटिक टुमारो’ या पॅनलच्या माध्यमातून राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे अध्यक्षपदाची निवडणूक लढवीत आहेत. परिवर्तनाची संधी म्हणून निवडणुकीकडे पाहतो. लढा आर्थिक बेशिस्त, गैरव्यवस्थापनाविरोधात असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
‘एशियाटिक सोसायटी’ची निवडणूक लढविण्यामागे आपल्या पॅनलची काय भूमिका आहे?
‘एशियाटिक सोसायटी’च्या कामाचा विस्तार आणि परीघ अधिक रुंद करण्यास आमचे प्राधान्य आहे. ही संस्था फोर्टबाहेर पडून महाराष्ट्रात जायला हवी. कार्यक्षम, प्रभावी व्यवस्थापनासाठी आम्ही सात कलमी कार्यक्रम राबविणार आहोत. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, महाराष्ट्र सेवा संघ, ठाणे नगर वाचनालय यांसारख्या संस्थांशी काळानुरूप जोडले जायला हवे. संस्था अधिक लोेकाभिमुख होणे गरजेचे आहे.
देशातील एका सर्वोत्तम संस्थेच्या निवडणुकीला उजवे विरुद्ध डावे असा रंग येताना दिसत आहे. अशा संस्थांत राजकारण यावे का?
संस्थेतील उजवे विरुद्ध डावे या राजकारणाला सध्याची व्यवस्थापन समिती जबाबदार आहे. ही मंडळी वैचारिक अस्पृश्यता पाळतात. हिंदुत्व संशोधनाचा विषय नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. अरुण टिकेकर वगैरे मंडळींच्या काळात आयडीओलॉजीचा विषय कधी आला नाही. मी उपाध्यक्ष म्हणून आधी काम पाहिलेले आहे.
सध्याच्या कारभाराबाबत आपले काय मत आहे? आपण कोणते विधायक बदल करणार आहात?
आर्थिक बेशिस्त आणि गैरव्यवस्थापनाने सोसायटीची प्रतिमा मलिन झाली आहे. ठेवी मोडण्यात आल्या. संस्थेला त्यातून ३ कोटींची नोटीस आली आहे. राज्य सरकारने दिलेला निधी, विविध ग्रँट, राज्यपालांनी डिजिटायझेशनसाठी दिलेले ५ कोटी यांचा योग्य वापर झालेला नाही. त्याबाबत ‘कॅग’ने ताशेरे ओढले आहेत. संस्थेत साहेबांच्या भाषेत व्यवहार चालतो. आम्ही स्थानिक भाषेत व्यवहाराला प्राधान्य देणार आहोत.
‘एशियाटिक सोसायटी’ची ग्रंथसंपदा जपण्यासाठी आणि एकंदरच इतर उपक्रमांसाठी निधीची आवश्यकता आहे? ती आपण कशी दूर करणार आहात?
खासगी देणगीदारांकडून निधी, कॉर्पोरेट कंपन्यांकडून सीएसआर फंड मिळविता येतो. त्यातून चांगले आर्थिक व्यवस्थापन करणार आहोत. कर्मचाऱ्यांना न्याय देणार आहोत. अभिलेख, नाणी यांचे वैज्ञानिक पद्धतीने जतन करणार आहोत.
तरुणांना जोडण्यासाठी व संशोधनाला नवी दिशा देण्यासाठी आपल्याकडे काय कार्यक्रम आहे?
सध्या मूलभूत संशोधनाचा कस पातळ झाला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील विषय संशोधनासाठी घेता येतील. राष्ट्र प्रथम या भावनेने ‘एशियाटिक’चे वैभव टिकविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. समाजमाध्यमे आणि नवमाध्यमांचा वापर करून तरुणांना जोडता येईल. त्यातून नवे संशोधक पुढे येतील. ‘ॲकॅडमिक रिगर’ला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल.
Web Summary : Vinay Sahasrabuddhe is contesting the Asiatic Society election to fight financial mismanagement and bring change. His panel aims to expand the society's reach, improve management, and prioritize local languages, focusing on research and youth engagement.
Web Summary : विनय सहस्रबुद्धे आर्थिक कुप्रबंधन से लड़ने और बदलाव लाने के लिए एशियाटिक सोसाइटी का चुनाव लड़ रहे हैं। उनके पैनल का लक्ष्य समाज की पहुंच का विस्तार करना, प्रबंधन में सुधार करना और अनुसंधान और युवा भागीदारी पर ध्यान केंद्रित करते हुए स्थानीय भाषाओं को प्राथमिकता देना है।