Join us  

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आमची युती काम करत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 7:02 PM

Eknath Shinde : निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आमची शिवसेना-भाजप युती काम करत नाही. निवडणुकांची चिंता आम्हाला नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

मुंबई : उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई सुशोभीकरणाच्या सुमारे १८७ कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबईच्या सौंदर्यीकरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी 'स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई आणि निरोगी मुंबई' या सर्व बाबींवर चर्चा झाली. दोन ते तीन महिन्यांत ही सगळी कामे पूर्ण करण्याचा एका एक्शन प्लॅन तयार झाला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आमची शिवसेना-भाजप युती काम करत नाही. निवडणुकांची चिंता आम्हाला नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई सुशोभीकरणाच्या कामाला गेल्या चार महिन्यात वेग देण्यात आला आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, कोळीवाड्यांचे सौंदर्यीकरण, आपला दवाखाना यासारख्या निर्णयांमुळे गतिमान मुंबईच्या वैभवात भर पडणार आहे. मुंबईतील सगळे रस्ते सुस्थितीत करणे. मुंबईचे सुशोभिकरण, संपूर्ण मुंबईमध्ये स्वच्छता मोठ्या प्रमाणात करणे. स्वच्छता या विषयाला प्राधान्य देऊन दृष्यस्वरूपात बदल दिसावे यासाठी मुंबई सुंदर करण्यासाठी ५००० स्वच्छतादूतांची नेमणूक करावी. महत्वाच्या इमारतींवर रोषणाई करावी, महत्वाचे रस्ते, चौक, स्कायवॉक, फ्लायओव्हर यांचे सुशोभीकरण करावे, मिशनमोडवर हे काम हाती घ्यावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

'महानगरात ज्याठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी सुरू आहे त्या कामांना गती द्यावी. त्याचबरोबर पूर्व द्रूतगती मार्ग आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावर अद्ययावत स्वच्छतागृहांची उभारणी तातडीने करावी. शहरातील स्कायवॉकवर रोषणाई करावी. त्याचबरोबर स्कायवॉकवर महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. याचबरोबर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईतील रस्ते, समुद्र किनारे, शौचालये यांची निरंतर स्वच्छता झाली पाहिजे. त्यासाठी महापालिकेने आवश्यक त्या यंत्रसामुग्री शहराच्या स्वच्छतेच्या गरजा ओळखून घ्याव्यात. स्वच्छतेच्याबाबतीत जगातल्या ज्या सर्वोत्तम संकल्पना आहेत त्या मुंबईत राबवाव्यात. झोपडपट्टी भागात कम्युनिटी वॉशिंग मशिन ही संकल्पना अंमलात आणावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. दरम्यान, सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबईच्या सौंदर्यीकरणाबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस चहल यांनी मुंबई सौंदर्यीकरणाचे सादरीकरण केले. मुंबईतील रस्त्यांच्या वरच्या थरांचे नुतनीकरण (रिसर्फेसिंग), पदपथ, रस्ते, पूल, वाहतूक बेटं, वॉलपेंटींग, उद्याने आणि कोळीवाडे यांच्या सुशोभीकरणाची माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस