...अन्यथा समुद्रात उग्र आंदोलन
By Admin | Updated: November 21, 2015 00:16 IST2015-11-20T21:08:45+5:302015-11-21T00:16:46+5:30
महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचा इशारा : सोमवंशी अहवालातील तरतुदी शासनाने मंजूर कराव्यात

...अन्यथा समुद्रात उग्र आंदोलन
मालवण : पर्ससीन मासेमारीमुळे शाश्वत मासेमारीला धोका आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आधुनिक मासेमारीमुळे ७० टक्के मत्स्यसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी लढ्याच्या माध्यमातून शासनाचा लक्ष वेधण्याचा अनेकदा प्रयत्नही केला आहे. भाजपा- शिवसेना युती सरकारने पर्ससीन मासेमारी रोखण्यास मदत करणारा डॉ. सोमवंशी अहवाल तत्वत: स्वीकारला आहे. या अहवालातील तरतुदींची शिफारस महाराष्ट्र मासेमारी अधिनियम १९८१ नुसार अधिसूचना एका महिन्याच्या कालावधीत मंजूर न केल्यास डहाणू ते सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सर्व मच्छिमारांना शासनाविरोधात भर समुद्र्रात उग्र आंदोलन छेडावे लागेल, अशी भूमिका अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी स्पष्ट केली.
मालवण येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत तांडेल बोलत होते. यावेळी कृती समितीचे उपाध्यक्ष संजय कोळी, बर्नाड डिमेलो, विजय तामेरे, मच्छिमार नेते रविकिरण तोरसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तांडेल म्हणाले, किनारपट्टीवर पर्ससीनच्या वाढत्या अतिक्रमणामुळे मत्स्यसाठ्यावर ताण पडत आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार करता केवळ ३० टक्के मत्स्य साठा उपलब्ध असून माशांच्या १२८ प्रजातींपैकी १०४ प्रजाती शिल्लक आहेत. पर्ससीनचा वावर राहिल्यास येत्या दोन वर्षात १५ टक्क्याहून कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे पर्ससीन मासेमारी करताना बोट आढळून आल्यास ती पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल.
आचरा येथे झालेले आंदोलन दुर्दैवी आहे. या आंदोलनात पत्रकारांना धक्काबुक्की करण्याचा जो प्रयत्न झाला त्याबाबत महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्यावतीने तांडेल यांनी दिलगिरी व्यक्त केली.
त्यासाठी आचरा राडाप्रकरणी गृह खात्याअंतर्गत उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी. त्यानंतरच मच्छिमारांवर पोलिसांनी कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे तांडेल यांनी स्पष्ट केले.
मत्स्य आयुक्तांना निलंबित करा
आचरा येथे झालेल्या संघर्षाची सहाय्यक मत्स्य आयुक्त सुगंधा चव्हाण यांना कल्पना होती. यामुळे त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेवून संबंधित पोलीस संरक्षण मागणे गरजेचे होते. त्यामुळे सुगंधा चव्हाण स्वत:ला निर्दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत त्यांना पदावरून निलंबित करण्याची मागणी मुख्यमंत्री व मत्स्योद्योगमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे तांडेल यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)
नारायण राणे यांना खुले आव्हान
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेवून पारंपरिक मच्छिमारांनी आधुनिकतेची कास धरावी अशा केलेल्या आवाहनाला मच्छिमार कृती समितीने विरोध केला.
त्यांच्या या आवाहनाला महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने प्रत्युत्तर देत आधुनिकतेच्या विषयावर राणे यांनी आमच्याशी थेट बोलावे.
राणे यांनी कोणत्या आधारावर आधुनिक मासेमारी करण्यास सांगितली आहे? आधुनिक मासेमारीचे कशारीतीने चांगली आहे हे नारायण राणे यांनी सिद्ध करावे.
डॉ. सोमवंशी अहवाल वाचून त्याचा अभ्यास करून आमच्याशी खुली चर्चा करावी असे थेट आव्हान राणे यांना मच्छिमार समितीने दिले आहे.