Join us  

… अन्यथा, शिवसेना भवन परिसरातला कचराच उचलला जाणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 3:42 PM

कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास जी-उत्तर विभागात म्हणजेच दादर परिसरात काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

मुंबई : विचार करा की, शिवसेना खासदार, शिवसेना आमदार आणि शिवसेना नगरसेवक असलेल्या दादरच्या परिसरात जिथे शिवसेना भवनची वास्तूही आहे, त्या परिसरातला कचराच जर उचलला गेला नाही, तर काय होईल? मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील कंत्राटी वाहन चालक आणि स्वच्छक कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार आहे. ह्या कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास जी-उत्तर विभागात म्हणजेच दादर परिसरात काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

ह्याविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक ह्यांनी सांगितलं की, “आपण जिथे राहतो, जिथे काम करतो तिथे निर्माण होणारा प्रत्येक प्रकारचा कचरा उचलण्यासाठी जी कचरा गाडी येते, त्या गाडीचा चालक आणि त्याच्यासोबतचा स्वच्छक कामगार हे कंत्राटी असतात. कंत्राटदार त्यांना सन्मानजनक वागणूक तर देतच नाहीत, उलट त्यांचं अनेक प्रकारचं शोषण करतात. कंत्राटदाराकडे काम करणा-या ह्या कंत्राटी वाहन चालक आणि स्वच्छक कामगारांना किमान वेतन सुविधा, भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा सुविधा, वेतन पावती अशा कामगार कायद्यानुसार द्यावयाच्या किमान सुविधा मिळत नाहीत. पालिकेत कार्यरत सर्व कंत्राटी कामगारांना ४६ टक्के लेव्हीचे अधिदान केले जाते, परंतु कंत्राटदार त्याचेही पालन करत नाहीत. शहरातील वाहतूककोंडी वाढत असतानाही कंत्राटदारांना कमीतकमी डिझेलमध्ये फेरी पूर्ण करायची असते. डिझेल जास्त वापरले जात आहे, असं सांगत वाहनचालकांचे वेतन विनाकारण कापण्यात येते.”

केतन नाईक पुढे म्हणाले, “कचरा वाहतूक ही महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांपैकी एक असून ही सेवा पुरवणा-या कामगारांना भेडसावणा-या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात, ह्यासाठी आम्ही आजवर अनेकदा पालिका अधिका-यांसोबत बैठका घेतल्या, चर्चा केली. न्याय्य हक्कांसाठी तब्बल पाच वर्षं कामगार लढत आहेत. पण अपेक्षित न्याय काही मिळाला नाही. आता मात्र कंत्राटदार आणि पालिका अधिकारी ह्यांना ‘जोर का झटका’ देण्यासाठी ‘काम बंद’ आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सर्व संबंधित कामगार आमच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत.”

“इण्डस्ट्रीयल डिस्प्यूट अ‍ॅक्ट, १९४७ कलम २२ चे उपकलम १ अंतर्गत संपावर जाण्याचा इशारा देणारी लेखी नोटीस आम्ही महापालिका आयुक्त आणि संबंधित कंत्राटदारांना पाठवली आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास लवकरच ‘काम बंद’ आंदोलन करण्यात येईल. ह्या आंदोलनामुळे जी-उत्तर विभागातला म्हणजेच दादर परिसरातला कचरा अजिबात उचलला जाणार नाही, आणि त्यामुळे जे काही परिणाम होतील त्यास नफेखोर कंत्राटदार आणि कर्तव्यच्युत पालिका अधिकारीच जबाबदार असतील”, असं महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक ह्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या पुढाकाराने ह्यासंदर्भातील एक महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दि. २२ नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या जी/उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांसोबत होणार आहे. ह्या बैठकीतही कामगारांच्या मागण्यांवर सन्मानजनक तोडगा न निघाल्यास ‘काम बंद’ आंदोलन पुकारण्याशिवाय आमच्यासमोर कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही, असंही मनसेच्या केतन नाईक ह्यांनी सांगितलं.  

असंख्य समस्यांना तोंड देत शेकडो वाहन चालक आणि स्वच्छक कामगार रोज किमान १०-१२ तास राबतात आणि त्यांच्यामुळेच आपली मुंबई, आपला परिसर स्वच्छ राहतो. पण दुर्दैवाने पैशाला चटावलेले नफेखोर कंत्राटदार आणि असंवेदनशील प्रशासकीय अधिकारी ह्यांमुळे स्वच्छक कामगारांना न्याय मिळण्यास अक्षम्य दिरंगाई होत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :राज ठाकरेमनसेशिवसेना