...अन्यथा मुरबाडमध्ये सेना मैत्रीपूर्ण लढत करणार
By Admin | Updated: September 14, 2014 23:41 IST2014-09-14T23:41:33+5:302014-09-14T23:41:33+5:30
मुरबाड विधानसभा मतदार संघ हा भाजपाच्या वाट्याला असून त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नसल्याने भाजपा या जागेसाठी उमेदवार आयात करण्याच्या तयारीत आहेत

...अन्यथा मुरबाडमध्ये सेना मैत्रीपूर्ण लढत करणार
बदलापूर : मुरबाड विधानसभा मतदार संघ हा भाजपाच्या वाट्याला असून त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नसल्याने भाजपा या जागेसाठी उमेदवार आयात करण्याच्या तयारीत आहेत. भाजपाच्या या नीतीला शिवसेनेच्या पदाधिका-यांनी विरोध दर्शविला आहे. भाजपा आयात उमेदवाराला रिंगणात उतरविणार असल्यास योग्य वेळी निर्णय घेत शिवसेना या मतदार संघात मैत्रीपूर्ण लढत करेल असा इशारा शिवसेनेच्या तीन तालुका प्रमुखांनी दिला आहे.
मुरबाड विधानसभा मतदार संघात भाजपाचा सलग तीन वेळा पराभव झाला असून या मतदार संघात शिवसेनेकडे सक्षम निवडून येणारा उमेदवार आहे, असे असतांनाही भाजपा या जागेवरील आपला दावा न सोडता उमेदवार आयात करण्याच्या तयारीत आहे. भाजपाच्या या खेळीवर मुरबाड विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक नाराज झाले आहे. मुरबाड विधानसभा क्षेत्रात कल्याण ग्रामीण, मुरबाड तालुका आणि अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर पट्ट्यातील ग्रामीण भागांचा समावेश आहे. तीन तालुक्यातील शिवसेनेच्या तालुका प्रमुखांची एकत्रित बैठक आज बदलापूरात झाली. त्यात अंबरनाथ तालुका प्रमुख एकनाथ शेलार, कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख विश्वनाथ जाधव आणि मुरबाड तालुका प्रमुख सुभाष घरत यांच्यासह बदलापूर शहराध्यक्ष वामन म्हात्रे आणि ग्रामीण भागातील महत्वाचे पदाधिकारी यांचा समावेश होता. यावेळी झालेल्या चर्चेत भाजपाने हा मतदार संघ उमेदवार नसल्याने शिवसेनेला सोडावा अशी मागणी एकमुखाने करण्यात आली आहे. ही निवडणूक भाजपा एकटी लढत नसून शिवसेना सोबत असल्याने भाजपाने शिवसेनेचाही विचार करावा. तसेच उमेदवार नसल्याने आयात उमेदवार युतीच्या माथी मारू नये अशी अपेक्षा या पदाधिकाऱ्यां व्यक्त केली.
(प्रतिनिधी)