Join us  

'राज्यातील स्थलांतरीत अन् विद्यार्थ्यांनाही मोफत प्रवासाचे तात्काळ आदेश द्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 1:46 PM

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने अचानक निर्णय बदलल्याने राज्यातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. सोमवारी राज्यभरातील एसटी डेपो बाहेर गर्दी जमा झाली होती.

मुंबई - लॉकडाऊनमुळे राज्यातील अडकलेल्या नागरिकांना आपल्या मूळगावी जायचे होते. यासाठी सरकारद्वारे एसटीची मोफत सेवेची घोषणा केली. मात्र, फक्त इतर राज्यातील अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत आणि इतर राज्यात अडकलेले जे महाराष्ट्राच्या सीमेवर आले आहेत. त्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यासाठीच एसटीची मोफत बस सेवा उपलब्ध राहणार आहे, असा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे स्थलांतरीत मजूर, प्रवासी, विद्यार्थी आणि नागरिकांची घोर निराशा झाली आहे. आता, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यांतील जिल्हांतर्गत प्रवाशांनाही मोफत सेवा द्यावी, अशी मागणी केली आहे.  

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने अचानक निर्णय बदलल्याने राज्यातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. सोमवारी राज्यभरातील एसटी डेपो बाहेर गर्दी जमा  झाली होती. मुंबई सेंट्रल येथील आगाराबाहेर गर्दी केलेल्या नागरिकांना हटविण्यासाठी पोलिसांना बोलाविण्यात आले. राज्यातील विविध भागात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नागरिकांनी राज्यातील प्रत्येक एसटी आगाराबाहेर गर्दी केली आहे. मुंबई सेंट्रल आगाराबाहेर राज्यातील मूळगावी जाणाऱ्या नागरिकांनी सर्व कागदपत्रे घेऊन गर्दी केली आहे. लॉकडाऊनमध्ये राज्यातील विविध भागात अडकलेल्या विद्यार्थी, मजूर, नागरिकांना घरी पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळाकडून ११ मे रोजीपासून मोफत बस सुरू होणार, राज्यभरात अडकलेल्या नागरिकांसाठी एसटीची मोफत सेवा मिळणार, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी ९ मे रोजी केली होती.  त्यानुसार मुंबई राहणारे विद्यार्थी, मजूर यांनी आगार, बस  डेपोकडे वाट धरली. आरोग्य प्रमाणपत्र, पोलीस परवानगी मिळविण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र, निर्णय बदलण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्य सरकार आणि परिवहन मंडळाच्या या निर्णयावर विरोधकांनी टीका केली असून राज्यातील सर्वच प्रवाशांना मोफत प्रवास देण्यात यावी, अशी मागणीही केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांच्या प्रवासाचा मुद्दा उचलून धरला आहे. ''स्थलांतरित कामगारांचा राज्यांतर्गत प्रवास 'एसटी'ने विनामूल्य करण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ आदेश द्यावेत. तसेच विविध शहरांमध्ये अडकलेले विद्यार्थी त्यांच्या मूळ गावी जाऊ इच्छितात, त्यांनाही मोफत बस प्रवासाची सोय उपलब्ध करून द्यावी, ही राज्य सरकारला विनंती आहे, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच, या ट्विटसोबत आपला व्हिडीओही शेअर केला आहे. 

दरम्यान, राज्य सरकारने आणि परिवहन महामंडळाने डबल भाडे घेऊन राज्यातील नागरिकांना गावी सोडल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबईबसचालकस्थलांतरणअनिल परब