Join us  

मेट्रो तीनच्या कामाला विरोध; गिरगावमध्ये डम्परवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 3:21 AM

वाहतूककोंडीचा त्रास होत असल्याचा आरोप

मुंबई : मेट्रो-३च्या कामाचा स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचा आरोप करत, याविरोधात नाराजी व्यक्त करत सोमवारी सकाळी शिवसेनेने गिरगावमधील मेट्रोच्या कामाला विरोध दर्शविला. सकाळी शिवसेनेने शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. मात्र, प्रशासनाकडून कोणतेही उत्तर मिळाने नाही. त्यानंतर शिवसैनिकांनी के. के. इंटरप्रायजेस या कंपनीच्या डम्परवर दगडफेक करत त्याची तोडफोड केली. प्रशासनाने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून गिरगावकरांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणीही शिवसैनिकांनी प्रशासनाकडे केली.ठाकूरद्वार ते गिरगावपर्यंतचा रस्ता मेट्रो-३च्या कामामुळे अरुंद झाला आहे. त्यातच चोवीस तास या रस्त्यावर कामासाठी डंपर येत असतात. प्रत्यक्षात दक्षिण मुंबईत अवजड वाहनांना बंदी असतानाही येथे मेट्रोच्या कामासाठी डंपरचा वापर केला जात आहे. याचा नागरिकांना त्रास होत असून शालेय विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. अरुंद रस्ते त्याच डंपरची ये-जा यामुळे येथे प्रचंड वाहतूककोंडी होते. दोन मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी तब्बल एक तास लागतो. आम्ही वारंवार महापालिका, वाहतूक पोलीसआणि मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनकडे (एमएमआरसी) तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे रहिवाशांनी सकाळी स्वत: रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिल्याचे शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.या आंदोलनादरम्यान चर्नी रोड स्थानकाबाहेर मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी उभ्या करून ठेवण्यात आलेल्या डंपरवर आंदोलकांकडून दगडफेक करत त्याची तोडफोड करण्यात आली.हा डंपर के. के. एंटरप्रायजेसच्या ठेकेदाराचा असल्याची माहिती समोर आली आहे. या डंपरच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. घटनेनंतर येथील सुरक्षेत पोलिसांकडून वाढ करण्यात आली.वाहतूककोंडीचा त्रासमेट्रो मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे. गिरगावजवळ भुयारीकरण करण्यात आले असून सध्या या ठिकाणी पोकलेनने ड्रीलिंगचे काम सुरू आहे. या कामामुळे आसपासच्या परिसराला हादरे बसत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच या ठिकाणी चोवीस तास डेब्रिज उचलण्यासाठी डम्परची ये-जा सुरू असल्याने रहिवासी त्रासले आहेत.वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली न गेल्याने अखेर आंदोलन केल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. आंदोलनादरम्यान चर्नी रोड स्थानकाबाहेर मेट्रोच्या कामासाठी उभ्या करण्यात आलेल्या डंपरवर दगडफेक करत त्याच्या काचा तोडण्यात आल्या.डम्परवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटकमुंबई मेट्रो-३च्या कामाविरोधाला आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गिरगावात तोडफोड केली. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांनी मोहम्मद समीर मन्सुरी (२०) याच्या तक्रारीवरुन ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मन्सुरीच्या तक्रारीनुसार, आंदोलकांनी त्यांच्या पार्क केलेल्या डम्परच्या काचांवर दगड मारले. यात, ते देखील जखमी झाले. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत, तिघांना अटक केली. अन्य दोघांचा तपास सुरू आहे.

टॅग्स :मेट्रो