Join us

राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 06:15 IST

महायुतीत तीन पक्षांची तोंडे ही तीन दिशेला आहेत. एक मंत्री म्हणतात, नारायण राणे यांनी मर्डर केला.

मुंबई : महायुतीत तीन पक्षांची तोंडे ही तीन दिशेला आहेत. एक मंत्री म्हणतात, नारायण राणे यांनी मर्डर केला. एक आमदार तुमच्या पायातील बूट, चप्पल कपडे सुद्धा सरकारने दिले, अशी मस्तीची भाषा वापरतात. कृषिमंत्री शेतकऱ्यांची लायकी काढतात. अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघडकीस येत आहेत. हिंदीची सक्ती केली जात आहे. शक्तिपीठ मार्ग थोपविला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर चहा-पानाला जाणे योग्य वाटत नसल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मविआ नेत्यांच्या बैठकीत सरकारच्या चहापानावर बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला.  य बैठकीला उद्धवसेनेचे आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, सचिन अहिर, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, सतेज पाटील, शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे उपस्थित होते.

‘शक्तिपीठ’लाही विरोध

शक्तिपीठ महामार्गाला १२ जिल्ह्यांतील शेतकरी विरोध करत आहेत. , गरज नसलेला हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी सतेज पाटील यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहा-पान कार्यक्रमाला जायचे म्हणजे पापच ! ज्या महामार्गाला माझ्या आजोबांचे नाव दिले, त्यावरच खड्डे पडले आहेत, नदी वाहत आहे, हे नेमके काय चालले आहे?

आदित्य ठाकरे, नेते, उद्धवसेना

हे सरकार भ्रष्टाचारात अखंड बुडालेले आहे. निधी हवे तरी टक्केवारी मोजावी लागते. कांदा, कापूस धानाला सोयाबीन पिकाला भाव नाही. कापसाला कीड लागलेली असताना मदत दिली जात नाही. सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे.

विजय वडेट्टीवार, नेते, काँग्रेस

महायुती सरकार राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहे. या सरकारचा सुरू असलेला राजकीय जुगार हा केविलवाणा व किळसवाणा आहे.

जितेंद्र आव्हाड, नेते, शरद पवार गट