Join us
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी गमावले मंत्री मुंडे, कोकाटेंसह विविध मुद्दे अन् सत्ताधारी नेते ठरले कामकाजात वरचढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 07:35 IST

विधान परिषद विश्लेषण

महेश पवार मुंबई : धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातील आरोप, उपसभापती गोन्हेचें साहित्य संमेलनातील 'ते' विधान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अभिनेता राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांची विधाने, लाडकी बहीण योजना असे विषय असतानाही विधान परिषदेतही विरोध पक्ष बॅकफूटवरच राहिल्याचे चित्र गत आठवड्यातील कामकाजात दिसून आले.

कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी करताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोर्टाने सुनावणी करून त्याची क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेली आहे. ती आल्यानंतर सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील, असे स्पष्ट केले. दुसऱ्या दिवशी विरोधकांनी मुद्दे रेटण्याआधीच भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी अबू आझमींनी औरंगजेबाच्या केलेल्या उदात्तीकरणाचा विषय काढून त्यांच्या निलंबनाची मागणी केली. त्याला विरोधकांनीही पाठिंबा दिला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोलापूरकर, कोरटकरांचा विषय मांडला. पण, फडणवीसांनी कोरटकरला चिल्लर म्हणत त्याचे महत्त्व नसल्याचे अधोरेखित केल्याने हा विषयही तेथेच थांबला. 

उद्धव ठाकरे पहिले तीनही दिवस सभागृहात उपस्थित होते. पण, 'मातोश्री' विषयी बोलणाऱ्या उपसभापति गोन्हे मात्र विधिमंडळात उशिराने फिरकल्या. त्यांच्याविषयीचा मुद्दा उपस्थित करण्याची संधी विरोधकांना मिळाली नाही, पण त्यांनी अविश्वास प्रस्ताव दिला.

झोंबणारी टीका अन् विरोधक एक पाऊल मागे

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना उद्धवसेनेचे अनिल परब यांनी केलेल्या विधानामुळे सत्ताधाऱ्यांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले. दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वादावर पडदा टाकल्याने शुक्रवारी तीन वेळेच्या तहकुबीनंतर कामकाज झाले. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत विरोधकांवर झोंबणारी टीका केली. एकूणच पहिल्या आठवड्यात विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे विरोधक एक पाऊल मागे गेल्याचे चित्र होते. तरीही विधानसभेपेक्षा विधान परिषदेत विरोधकांची कामगिरी चांगली होती. 

टॅग्स :महाराष्ट्र बजेट 2025देवेंद्र फडणवीसमहाविकास आघाडी