Join us

मतदार याद्यांमध्ये घोळ नको, विरोधी पक्षांची अपेक्षा; महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 11:34 IST

महापालिकेत लोकनियुक्त नगरसेवक नसल्याने सर्व निर्णय एकतर्फी होत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केला. निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत.

सुजित महामुलकर

मुंबई : गेली तीन वर्षे मुंबई महापालिकेत प्रशासक काम करीत असून, लवकरच लोकप्रतिनिधींचा आवाज घुमण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रमुख राजकीय पक्ष निवडणुकीला सज्ज झाले आहेत. मात्र, मतदार याद्यांचा घोळ होऊ नये, अशी अपेक्षा विरोधी पक्षांकडून व्यक्त केली जात आहे.

महापालिकेत लोकनियुक्त नगरसेवक नसल्याने सर्व निर्णय एकतर्फी होत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केला. निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. मात्र, मतदार याद्यांमध्ये घोळ होऊ नये आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर होणार नाही, अशी आमची अपेक्षा आहे. पारदर्शक आणि लोकशाही मार्गाने निवडणूक झाली तर मुंबईकर योग्य निर्णय घेतील आणि आपले खरे प्रतिनिधी निवडून देतील, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.

विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष

खड्डे, वाहतूककोंडी, पुलांचे अपूर्ण काम, नालेसफाईतील त्रुटी, प्रदूषण यासारख्या प्रश्नांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची टीका गायकवाड यांनी केली. मुंबईकरांचे प्रश्न सोडवणारे लोकप्रतिनिधी आवश्यक आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

निवडणुकीला सामोरे जाण्याची आमची तयारी : सचिन अहिर

आमची निवडणुकीला सामोरे जाण्याची पूर्ण तयारी आहेच. आम्ही सर्व

प्रभागातील प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना मतदार याद्यांबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि निवडणूक प्रक्रियेवरही लक्ष राहील, असे उद्धवसेनेचे प्रवक्ते सचिन अहिर यांनी सांगितले.

राज्य सरकारची महापालिका निवडणूक घेण्याची अजूनही मानसिकता दिसत नाही. महायुतीला निवडणुकीबाबत चिंता असल्याने कदाचित त्यांच्याकडून पुन्हा निवडणूक पुढे ढकलण्याचे प्रयत्न होऊ शकतात, अशी शक्यता अहिर यांनी वर्तविली.

... यासारखे दुर्दैव नाही : संदीप देशपांडे

मतदार याद्यांमध्ये घोळ होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून राज्यातील सरकार आणि निवडणूक आयोगाने निवडणुका घ्याव्यात आणि जनतेवर उपकार करावेत, असा खोचक टोला मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी लगावला. तसेच निवडणूक आयोगाने गेली ३ वर्षे निवडणूक घेतली नाही आणि लोकशाहीत निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला आदेश द्यावा लागतो, यासारखे दुर्दैव नाही, असेही देशपांडे म्हणाले.