पालिकेत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमध्ये खडाजंगी
By Admin | Updated: February 24, 2015 00:59 IST2015-02-24T00:59:49+5:302015-02-24T00:59:49+5:30
जानेवारी महिन्याच्या सभेत तत्कालीन काँगे्रस नगरसेवकाने अपशब्द वापरल्याचा उल्लेख इतिवृत्तात नसल्याचे कारण देत राष्ट्रवादीच्या

पालिकेत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमध्ये खडाजंगी
नवी मुंबई : जानेवारी महिन्याच्या सभेत तत्कालीन काँगे्रस नगरसेवकाने अपशब्द वापरल्याचा उल्लेख इतिवृत्तात नसल्याचे कारण देत राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने सोमवारच्या महासभेत आक्षेप नोंदविला. त्यांच्या समर्थनार्थ पक्षाच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले. शिवसेनेने सत्ताधारी नगरसेवकांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण करून कामकाजावर बहिष्कार टाकला.
महानगरपालिकेच्या २१ जानेवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नेरूळ सेक्टर २० मधील मार्केटच्या भूखंडाचा विषय चर्चेसाठी आला होता. यावेळी नगरसेवक नामदेव भगत व राष्ट्रवादीचे नगरसेवक सूरज पाटील यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती. या सभेचे इतिवृत्त मंजुरीला आले असताना पाटील यांनी इतिवृत्तावर आक्षेप घेतला. भगत यांनी सभेत वडिलांविषयी अपशब्द वापरले होते त्याचा उल्लेख आलेला नाही. यावेळी झालेल्या चर्चेचा तपशीलही आलेला नसल्याचे सांगितले व जमिनीवर बसून अपशब्द वापरणाऱ्यांचा व प्रशासनाचाही निषेध केला. राष्ट्रवादी काँगे्रसच्या इतर नगरसेवकांनीही खाली बसून त्यांना समर्थन दिले. महापौरांनी समजावल्यानंतरही विरोध सुरूच राहिला.
शिवसेना नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या या कृतीविषयी आक्षेप घेतला. जर संबंधित सदस्यांनी अपशब्द वापरला होता तर त्याविषयी त्याच वेळी आक्षेप नोंदविणे आवश्यक होते. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तेव्हाच हरकत नोंदविली पाहिजे होती. महापौरांनी सभागृहाच्या कामकाजातून ते शब्द वगळण्यास भाग पाडले पाहिजे होते. परंतु तसे काहीच झाले नाही. आता तो विषय उकरून काढण्याचे कारणच काय, असा प्रश्न उपस्थित केला. महापौरांनी या घटनेचे रेकॉर्डिंग तपासून योग्य इतिवृत्त तयार करावे. अपशब्द वापरला असेल तर ते शब्द कामकाजातून काढावे, परंतु अपशब्द वापरल्याचा उल्लेख ठेवावा अशा सूचना केल्या. यानंतर शिवसेना सदस्यांनी सत्ताधाऱ्यांच्या हेतूविषयी शंका उपस्थित करून कामकाजावर बहिष्कार टाकला. कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील व कोमल वास्कर यांनी सभागृहात येऊन कोरम पूर्र्ण नसताना सभा सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र महापौरांनी सभा नियमाप्रमाणे सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले.(प्रतिनिधी)