Join us  

भाजप-सेना युतीसमोर विरोधकांचे आव्हान नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 12:59 AM

आशिष शेलार : विरोधकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज

मुंबई : निवडणूक जिंकण्यासाठी लढत असल्याचे कोणीही विरोधी पक्ष म्हणण्यास तयार नाही. सद्यपरिस्थितीत सर्व पक्ष केवळ पराभवाचा बहाणा शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत़ भाजप - शिवसेना महायुतीसमोर विरोधी पक्षांचे आव्हान उरलेले नाही, अशी भूमिका राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व वांद्रे पूर्व मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मांडली.

भाजपसमोर आव्हान नाही असा दावा केला जातो, खरंच अशी परिस्थिती आहे का?विरोधकांच्या आघाडीतील पक्षांचा एकमेकांवर विश्वास उरलेला नाही. विरोधी पक्षाचे नेते आपापल्या मतदारसंघाच्या बाहेर पडायला तयार नाहीत व टीका करताना थेट पंतप्रधानांवर करत आहेत़ राज्यात सर्वांत जास्त काळ राजकारण करणाऱ्या व सत्तेत राहणाºया शरद पवारांना आता राज्यासाठी अजून काही करायची इच्छा होणे म्हणजे इतकी वर्षे त्यांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित होणारच.

युतीमध्ये आतापर्यंत शिवसेना मोठा भाऊ व भाजप छोटा भाऊ अशी परिस्थिती होती, आता त्यामध्ये बदल झाल्याने परिस्थितीत काय बदल झाला आहे?आमची भावकी आता जमली आहे़ कोण छोटा भाऊ व कोण मोठा भाऊ याचा आम्ही विचार करत नाही.

निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांवर भर आहे?आमच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने सक्षम, पारदर्शी, निष्कलंक व स्वच्छ नेतृत्व आहे. तर विरोधक नेतृत्वहीन आहेत. गेल्या पाच वर्षांत राज्यात झालेला विकास नागरिकांनी अनुभवला आहे. त्यामुळे आम्हाला या जोरावरपुन्हा सत्ता मिळेल असा विश्वास आहे.

विद्यमान सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे; त्याकडे कसे पाहता?पवारांची टीका खरी मानायची असेल तर ‘शेतकरी प्रेमी’ या शब्दाची व्याख्या नव्याने करावी लागेल. राज्य सहकारी बँकेत शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये खाणाºया व शेतकºयांना देशोधडीला लावणाºया काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असे बोलणे चुकीचे आहे. उच्च न्यायालयानेदेखील त्यावर ताशेरे ओढलेले आहेत.

मुंबईतील कोणत्या समस्या सोडविण्यासाठी सरकारचे प्राधान्य असेल?वाहतूककोंडी हटवणे, परवडणारी घरे देणे, पायाभूत सुविधा वाढवणे याला आमचे प्राधान्य असणार आहे. मुंबईतील समस्या सोडविण्यासाठी अनेक यंत्रणांसोबत समन्वय गरजेचा आहे़ राज्य सरकार, मुंबई महापालिका, रेल्वे, विमानतळ, एमएमआरडीए या सर्वांसोबत समन्वय साधून निर्णय घ्यावा लागतो. मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांमध्ये मुंबईकरांसाठी भरीव काम केले असून पूर्वीच्या तुलनेत अधिक सुविधा पुरविल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी भाजपवर प्रेम केले असून भाजपचेदेखील मुंबईकरांवर प्रेम आहे.

विधानसभेच्या निवडणूक प्रचारामध्ये सातत्याने ३७० कलमाबाबत प्रचार करणे कितपत योग्य आहे?महाराष्ट्र देशाचा भाग असून देश एकसंध राहणे गरजेचे आहे. ३७० कलम, ३५ ए रद्द करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने विरोध केला आहे. याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना जे वाटते तेच शरद पवारांना वाटत असेल तर आम्ही सातत्याने हा मुद्दा प्रचारात आणू.

टॅग्स :आशीष शेलार