नगरसेवकांना वेध आमदारकीचे
By Admin | Updated: October 7, 2014 02:26 IST2014-10-07T02:26:20+5:302014-10-07T02:26:20+5:30
एखाद्या छोट्याशा राज्याच्या अर्थसंकल्पाशी तुलना होणारी मुंबई महापालिका देशातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते़
नगरसेवकांना वेध आमदारकीचे
मुंबई : एखाद्या छोट्याशा राज्याच्या अर्थसंकल्पाशी तुलना होणारी मुंबई महापालिका देशातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते़ पण ही महापालिकाच केवळ श्रीमंत नसून येथील नगरसेवकही कोट्यधीश आहेत़ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नगरसेवकांनी आपल्या शपथपत्रातून आपली श्रीमंती जाहीर केली आहे़
राजकीय कारकिर्दीची पहिली पायरी म्हणजेच नगरसेवकपद मिळाल्यानंतर अनेकांना आमदारकीचीही स्वप्ने पडू लागतात़ यंदा फाटाफुटीमुळे तब्बल २५ नगरसेवकाना विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. त्यांचे भवितव्य १५ आॅक्टोबर रोजी मतपत्रिकांमध्ये बंद होणार आहे़ त्यामुळे उमेदवारी मिळालेले नगरसेवक ही लढाई जिंकण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत़
या नगरसेवक उमेदवारांनी निवडणूक कार्यालयाकडे सादर केलेल्या शपथपत्रानुसार निम्मे नगरसेवक कोट्यधीश असल्याचे दिसून येत आहे़ विशेष म्हणजे बहुतेक जण व्यावसायिक असून मालमत्तेचा मोठा हिस्सा त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे़ अनेकांनी शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे़ तर काहींनी जमिनी खरेदीवर भर दिला आहे़ मात्र राहते घर व जमिनी अशा मालमत्ता २० ते ३० वर्षांपूर्वी खरेदी केल्या असून आता त्यांचे बाजारमूल्य कोटीच्या घरात असल्याचा युक्तिवाद अनेकांनी केला आहे़ (प्रतिनिधी)