Join us
Daily Top 2Weekly Top 5

एटीकेटीनंतरही अकरावी प्रवेशाची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 16:13 IST

दहावीच्या परीक्षेत एक किंवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई : दहावीच्या परीक्षेत एक किंवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत एटीकेटी  मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही अकरावीसाठी प्रवेश घेण्याची मुभा राज्य शिक्षण विभागाने दिली आहे. ही सुविधा सध्या फक्त राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठीच लागू आहे. मात्र, संबंधित महाविद्यालयांनी अन्य मंडळांत एटीकेटीची अट स्वीकारल्यास त्यानुसार प्रवेश देता येईल. 

एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत दिला जाणारा हा प्रवेश हा तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. जुलैमध्ये होणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेनंतर विशेष फेरी आयोजित केली जाते. या फेरीत संबंधित विद्यार्थी त्या विषयात उत्तीर्ण झाल्यास त्याचा प्रवेश कायम केला जातो. इंग्रजी विषयात एटीकेटी असले तरी प्रवेश मिळतो. मात्र अकरावीतील प्रवेश कायम ठेवण्यासाठी इंग्रजीत नंतर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्यांना मात्र दहावीत विज्ञान विषयात किमान ४० टक्क्यांची गुणांची गरज आहे. मात्र अन्य मंडळाच्या अर्थात सीबीएसई,  आयजीएसई अशा मंडळाच्या विद्यार्थ्यांना पूर्णत उत्तीर्ण झाल्याशिवाय राज्य मंडळाच्या  अकरावी प्रवेशासाठी अर्ज करता येणार नाही, हेही शिक्षण विभागाने निर्णयात सांगितले आहे.  

दहावीत एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. ही सवलत म्हणजे त्यांच्यासाठी दुसरी संधी आहे. अकरावी प्रवेशप्रक्रियेत भाग घ्यावा आणि अभ्यास सुरू ठेवावा. मात्र नियमांचे पालनही आवश्यक आहे, असे समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

मुंबईतील शाखानिहाय जागा कला शाखा     १५२ वाणिज्य शाखा- ४७५ विज्ञान शाखा- ३०६ उच्च माध्यमिक व्होकेशनल- १०२

टॅग्स :प्रवेश प्रक्रियामुंबई