आॅपरेशन दाऊद भ्रष्ट पोलिसांमुळे फसले

By Admin | Updated: August 25, 2015 02:42 IST2015-08-25T02:42:17+5:302015-08-25T02:42:17+5:30

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा मुख्य सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पाकिस्तानात घुसून खात्मा करण्याची गोपनीय योजना आखण्यात आली होती.

Operation David Cropped by Corrupt Police | आॅपरेशन दाऊद भ्रष्ट पोलिसांमुळे फसले

आॅपरेशन दाऊद भ्रष्ट पोलिसांमुळे फसले

नवी दिल्ली : १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा मुख्य सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पाकिस्तानात घुसून खात्मा करण्याची गोपनीय योजना आखण्यात आली होती. परंतु मुंबई पोलिसातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हे शक्य झाले नाही, असा गौप्यस्फोट माजी गृहसचिव आर.के. सिंग यांनी केला आहे. तसेच आता दाऊदविरोधात एखाद्या तिसऱ्या देशात मोहीम राबविण्याबाबत शक्यतेचेही संकेत त्यांनी दिले.
दाऊदसाठी केंद्र सरकारने पाकिस्तानवर दबाव वाढविला असतानाच आता भाजपाचे खासदार झालेल्या सिंग यांनी एका वृत्तवाहिनीकडे हा दावा केला आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ही गुप्त योजना आखण्यात आली होती. विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल त्यावेळी आयबीचे प्रमुख होते.
दाऊदला संपविण्यासाठी केंद्र सरकारने छोटा राजन टोळीतील काही लोकांना या मोहिमेत सहभागी करून त्यांना गुप्त स्थळी प्रशिक्षण देणे सुरू केले होते. परंतु दाऊदशी संबंधित मुंबई पोलिसातील काही अधिकारी प्रशिक्षण शिबिरात या लोकांना अटक करण्यासाठी पोहोचले. प्रशिक्षण घेणाऱ्यांविरुद्ध अटक वॉरंट असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे होते. यामुळेच संपूर्ण मोहिमेवर पाणी फेरले गेले, असा दावा सिंग यांनी केला आहे. दाऊद व लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद हे दोघे पाकिस्तानी लष्कर व आयएसआयच्या संरक्षणात आहेत, याकडे लक्ष वेधतानाच अमेरिकेने लादेन आणि मुल्ला उमरला ज्या पध्दतीने ठार मारले
तशीच गुप्त मोहीम सरकारला हाती घ्यावी लागेल, असे मत त्यांनी मांडले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Operation David Cropped by Corrupt Police