Join us  

खुल्या वर्गातील विद्यार्थी नाराज, न्यायालयात जाण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 5:32 AM

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा तिढा सोडविण्यासाठी सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला असला तरी यावर मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे समाधान झालेले नाही.

मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना १६ टक्के आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारने मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रवेश निश्चितीचे निर्देश दिले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलक मराठा विद्यार्थ्यांनी केला आहे. तर दुसरीकडे खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी या अध्यादेशाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा तिढा सोडविण्यासाठी सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला असला तरी यावर मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे समाधान झालेले नाही. आम्हाला ज्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे आणि जो अभ्यासक्रम मिळाला आहे, तोच मिळायला हवा, या मागणीवर मराठा विद्यार्थी ठाम आहेत. या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आले, तर तो टिकेल का, अशी भीतीही त्यांना आहे. त्यामुळे प्रवेश निश्चित झाल्याची सूचना किंवा निर्देश सीईटी कक्ष किंवा वैद्यकीय संचलनालयाच्या संकेतस्थळावर दिले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे डॉ. आरती मोरे या आंदोलक विद्यार्थिनीने सांगितले. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी आझाद मैदानात जाऊन या विद्यार्थ्यांची भेट घेतली.वैद्यकीय प्रवेशाच्या जागा वाढविण्यासंदर्भात राज्य सरकारने केंद्राकडे मागणी केली आहे. मात्र, त्याबद्दल अजून निश्चिती नसल्याने, या अध्यादेशामुळे खुल्या वर्गातील जागा कमी होतील. त्यामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी अध्यादेशाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, ते सर्वाेच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.

सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड मराठा आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीलाशुक्रवारी आंदोलनाच्या १३व्या दिवशी मराठा आंदोलक विद्यार्थ्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी आझाद मैदानात जाऊन भेट घेतली. वैद्यकीय प्रवेशासंदर्भातील अध्यादेशाला आव्हान देण्यात आल्यास, मराठा विद्यार्थ्यांच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहील, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना दिले, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर नागपूर खंडपीठ स्थगिती कसे देऊ शकते, असा सवाल करत, जितेंद्र आव्हाड यांनी भाजपच्या मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

...तर दंडात्मक कारवाई होणारडॉक्टर विद्यार्थ्यांचे आंदोलन संपल्यानंतर परवानगी देण्यात येईल. नोटीसकडे दुर्लक्ष करीत आंदोलन केल्यास त्यांच्यावर कलम १८८ प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत वाखारे यांनी पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आंदोलनास परवानगी नाकारलीमराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयावर खुल्या वर्गातील विद्यार्थी, पालकांनी नाराजी व्यक्त करत, शनिवारी आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आधीच ५ मे पासून आझाद मैदानात मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आता खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यास, आझाद मैदानात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण देत पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली.पोलिसांच्या या निर्णयावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही लोकशाही मार्गाने शांततापूर्वक आंदोलन करणार होतो, मात्र आमचा हा हक्क डावलण्यात आला, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :मराठा आरक्षणवैद्यकीय