महिला प्रवाशावर पान-गुटखा खाऊन थुंकल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 06:19 IST2018-11-29T06:18:57+5:302018-11-29T06:19:01+5:30

दादरमधील प्रकार; पोलीस तपास सुरू

Open the pan-gutka and spit on the female passenger | महिला प्रवाशावर पान-गुटखा खाऊन थुंकल्याचे उघड

महिला प्रवाशावर पान-गुटखा खाऊन थुंकल्याचे उघड

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात सोमवारी रात्रीच्या सुमारास जलद लोकलची प्रतीक्षा करत असलेल्या महिला प्रवाशावर पान, गुटखा खाऊन थुंकल्याचा किळसवाणा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.


दादरच्या फलाट क्रमांक ३ वर सोमवार, २६ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास अंकिता भातखंडे या महिला प्रवासी बोरीवली जलद लोकलची प्रतीक्षा करत उभ्या होत्या. दरम्यान, विरार जलद गाडीतून जाणारा अज्ञात प्रवासी जाणीवपूर्वक पान, गुटखा खाऊन त्यांच्या अंगावर थुंकल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. भातखंडे यांनी या प्रकरणी टिष्ट्वटरवरून पश्चिम रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली. तर, आम्ही या तक्रारीची दखल घेतली असून, योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे उत्तर रेल्वे प्रशासनाकडून त्यांना देण्यात आले. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नसल्याने या घटनेचे चित्रीकरण उपलब्ध होऊ शकलेले नाही.


महिला प्रवाशांसोबत असे प्रकार यापूर्वीदेखील घडल्याने या प्रकारातील आरोपींना त्वरित अटक करावी, असे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशा मागण्या भातखंडे यांनी केल्या आहेत. याबाबत मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांतदेखील त्यांनी तक्रार केली आहे.

Web Title: Open the pan-gutka and spit on the female passenger