ओपन जिमला परवानगी नाही - पालिका
By Admin | Updated: November 18, 2015 03:01 IST2015-11-18T03:01:05+5:302015-11-18T03:01:05+5:30
शिवसेनेचे युवाध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मरिन ड्राईव्हवर साकारण्यात आलेल्या ओपन जीमला सध्या तरी परवानगी मिळालेली नाही. परिणामी आता यावर शिवसेना

ओपन जिमला परवानगी नाही - पालिका
मुंबई: शिवसेनेचे युवाध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मरिन ड्राईव्हवर साकारण्यात आलेल्या ओपन जीमला सध्या तरी परवानगी मिळालेली नाही. परिणामी आता यावर शिवसेना नेमकी काय भूमिका घेते? याकडे तमाम मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले असून, शिवसेनेच्या भूमिकेनंतर पुन्हा एकदा ओपन
जीमचा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
मरिन ड्राईव्ह येथे उभारण्यात आलेली ओपन जीम हटविण्याचा निर्णय न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्त अजय मेहता यांच्या त्रिसदस्य समितीने घेतला आहे. ओपन जीम ठराविक मुदतीत हटविण्यात आली नाही, तर महापालिकेकडून कारवाई केली जाईल, असा इशारा समितीने दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे आठवड्याभरात यासंबंधीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पुरातन वास्तू समिती अध्यक्ष असलेल्या समितीला याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. महत्त्वाचे म्हणजे आयुक्तांनी दिलेल्या परवानगीनुसार तीन महिन्यांची मुदत १६ आॅक्टोबर रोजी संपली आहे. त्यामुळे यासंदर्भातील एक बैठक नुकतीच झाली आहे. बैठकीचा वृत्तांत आल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.
ओपन जीमसाठी मरिन ड्राईव्ह ही जागा योग्य नाही. कारण मरिन ड्राईव्ह जागतिक पुरातन परिसरात मोडते. त्यामुळे ओपन जीमसाठी
मैदान, उद्याने अथवा पर्यायी जागेचा शोध घेण्यात यावा, असे समितीने म्हटले आहे. महापालिकेने यासंदर्भातील ठोस निर्णय घेतल्यानंतर शिवसेना नेमकी
काय भूमिका मांडते? यावर
ओपन जीमची मदार अवलंबून
असेल. (प्रतिनिधी)
उभारण्यात स्वार्थ नाही : आदित्य ठाकरे
मरिन ड्राईव्ह येथे ओपन जिम उभारण्यामागे आपला वैयक्तिक स्वार्थ नसल्याचा खुलासा युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केला आहे. मुंबईकरांना आरोग्यासाठी, व्यायामासाठी मोफत साहित्य उपलब्ध व्हावे, हा हेतु ओपन जिम उभारण्यामागे होता, असेही आदित्य यांनी स्पष्ट केले. समितीने जिम हटविण्याचा निर्णय घेतला नसून उलट ओपन जिमला आणखी वेळ देण्याची शिफारस केल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
ओपन जिमला मुद्दाम विरोध - खा. अनिल देसाई
काही ठराविक लोकांनी ओपन जिमला जाणीवपूर्वक विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. स्थानिक लोक मोठ्या प्रमाणावर ओपन जिमचा फायदा घेत आहेत. या जिममुळे कोणताच अडथळा होत नाही. सर्वांसाठी हे खुले असतानाही मुद्दाम विरोध केला जात असल्याचा आरोप शिवसेना खा. अनिल देसाई यांनी सांगितले.