डोळे उघडून बघा गड्यांनो... झापड लावू नका!

By Admin | Updated: August 11, 2014 00:20 IST2014-08-10T23:10:05+5:302014-08-11T00:20:40+5:30

वैज्ञानिक जाणिवांचा जागर : ‘अंनिस’च्या लोकरंगमंच उपक्रमांतर्गत राज्यभरातून रिंगणनाट्ये सादर

Open the eyes and see ... do not shackle! | डोळे उघडून बघा गड्यांनो... झापड लावू नका!

डोळे उघडून बघा गड्यांनो... झापड लावू नका!

सातारा : ‘पाऊल टाका पुढे गड्या रं... खुडू अंधश्रद्धेची मुळं’ अशी साद घालत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यभरातील कार्यकर्ते रविवारी साताऱ्यात एकत्र आले. ‘लोकरंगमंच’ या उपक्रमांतर्गत ‘रिंगणनाट्य’ या आगळ्या संकल्पनेद्वारे वैज्ञानिक जाणिवांचा जागर सुरू झाला असून, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हौतात्म्यदिनापर्यंत हा जागर राज्यभरात सुरू राहणार आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याला शनिवारी पंचवीस वर्षे पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर यांची पुण्यात हत्या होऊन वीस तारखेला वर्ष पूर्ण होत आहे. या अकरा दिवसांच्या काळात ‘रिंगणनाट्य’ प्रकल्पाद्वारे राज्यभरात जनजागरण करण्याचा ‘अंनिस’चा निर्धार आहे. या उपक्रमाची सुरुवात साताऱ्यात रविवारी झाली. सकाळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी परिसरात चळवळीच्या नव्या गीतांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर राज्यभरातून आलेले कार्यकर्ते मोर्चाने राधिका संकुलात पोहोचले. अकरा वाजल्यापासून रिंगणनाट्यांचे सादरीकरण सुरू झाले.
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या एकाच विषयात फलज्योतिषापासून नरबळीपर्यंत असंख्य शत्रूंशी एकाच वेळी लढणे अंतर्भूत आहे. त्यामुळे राज्यभरात समितीने तयार केलेल्या १८ गटांनी वेगवेगळ्या विषयांवर १८ नाटके बसविली आहेत. दिग्दर्शक अतुल पेठे यांनी चार महिन्यांत चार कार्यशाळा घेऊन रंगभूमीचा अवकाश ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितला आणि त्यांच्याकडूनच नाटकाच्या संहिता लिहवून घेतल्या. डॉ. दाभोलकरांची हत्या, जादूटोणाविरोधी कायदा, अघोरी उपचारपद्धती, शहरी अंधश्रद्धा, मानसमित्र प्रकल्प, जातपंचायत अशा विविध विषयांवर सुमारे वीस मिनिटांची नाटके तयार करण्यात आली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी रविवारी त्यांचे सलग सादरीकरण केले.
सातारच्या परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते या निमित्ताने एकत्र जमले होते. त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात नाटकांचे सादरीकरण केले. पथनाट्याहून काहीसा वेगळा असणारा हा घाट बंदिस्त सभागृहात किंवा मैदानात सादरीकरण करता येण्याजोगा आहे. रविवारच्या प्रयोगाला माफक वेशभूषेसह, पारंपरिक वाद्ये आणि ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करण्यात आला. यानंतर प्रत्येक पथक आपापल्या भागात आपापल्या नाटकाचा प्रयोग सादर करीत राहील. त्यानंतर सर्व कार्यकर्ते डॉ. दाभोलकरांच्या हौतात्म्यदिनी, वीस आॅगस्टला पुण्यात जमतील. तेथील मनोहर मंगल कार्यालयात या नाटकांचा शंभरावा प्रयोग होणे अपेक्षित आहे.
पुण्यातील प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, डॉ. श्रीराम लागू, दिग्दर्शक सुनील सुकथनकर, सुमित्रा भावे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी हे सर्व संच आपापल्या भागात आपापल्या रिंगण नाट्याचे प्रयोग सादर करणार आहेत. (प्रतिनिधी)

सुश्राव्य गाण्यांनी वातावरण भारले
चळवळीची जुनी, पारंपरिक गाणी वगळून या उपक्रमात नवीन गाणी तयार करण्यात आली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित अनेक विषयांवर कार्यकर्त्यांनीच गाणी लिहून ती संगीतबद्ध केली आहेत. रविवारच्या प्रयोगात हार्मोनियम, ढोलकी, घुंगरू, डफ अशा पारंपरिक वाद्यांचा वापर करून परिणामकारक सादरीकरण करण्यात आले. ‘पाऊल टाका पुढे गड्यांनो, खुडू अंधश्रद्धेची मुळं,’ ‘जादूटोणाविरोधी कायदा, जरा समजून घ्या हो दादा,’ ‘डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका,’ अशी एकाहून एक सुश्राव्य गाण्यांनी वातावरण भारले होते. कलावंतांनी एकसारखे टी-शर्ट परिधान केल्यानेही वातावरणनिर्मिती चांगली झाली. रिंगणनाट्यात लहान मुलांपासून वयस्क व्यक्तींपर्यंत सर्वांनी हिरीरीने सहभाग नोंदविला. तसेच, महिलांची संख्याही लक्षणीय होती.

Web Title: Open the eyes and see ... do not shackle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.