Join us
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: कोरोनामुक्त झालेल्यांसाठी लसीचा केवळ एक डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 09:40 IST

Corona Vaccination: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ एक डोस पुरे असल्याचा निष्कर्ष मांडला आहे. जगभरात विविध पातळ्यांवर याविषयी संशोधन सुरू आहे

मुंबई : लॅन्सेटच्या अंतर्गत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील इबायोमेडिसिन संशोधन अहवालातील बाबींनुसार, कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ एक डोस पुरे असल्याचा निष्कर्ष मांडला आहे. जगभरात विविध पातळ्यांवर याविषयी संशोधन सुरू असून, वैद्यकीय तज्ज्ञांच्या वर्तुळातूनही सकारात्मकता दर्शविण्यात येत आहे.

शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, कोरोनावर मात करणाऱ्या व्यक्तींमध्ये पुरेशा प्रमाणात अँटिबॉडीज तयार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. एका वैद्यकीय नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित आहे. त्यामुळे या रुग्णांच्या शरीरात तीन ते सहा महिने अँटिबॉडीज राहतात. परिणामी, लसीचा केवळ एक डोस हा कोरोनामुक्त व्यक्तींसाठी बूस्टर डोस असतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणात आढळले आहे.

याविषयी, राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, कोरोनामुक्त झाल्यानंतर रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झालेली असते, तीन किंवा सहा महिने ही रोगप्रतिकारशक्ती टिकून राहते. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी लसीचा केवळ एक डोस हा बूस्टर ठरतो. दरम्यान, अद्याप या संशोधनावर केंद्राकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, विविध संशोधनांत आढळून आलेल्या बाबी निष्कर्षांनुसार सकारात्मक आहे; परंतु त्याबद्दल अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. लसीकरण प्रक्रियेचा वेग वाढविण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यासाठीही हे संशोधन उपयुक्त ठरू शकते.

तीन महिन्यांनी लसीचा लाभ

कोरोनातून बरे झालेल्यांच्या लसीकरण करण्यासंदर्भात केंद्र सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी नागरिकांना लस घेता येणार आहे. नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑफ व्हॅक्सिन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविडने देशातील आणि जगातील कोरोनास्थिती याबाबत अभ्यास केला. या अभ्यासावर आधारित अहवाल स्वीकारल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही नियमावली जाहीर केली आहे.

निर्णय झाल्यास लसीकरणास वेग

लसीकरण प्रक्रियेचा वेग आपल्याकडे अजूनही मंदावलेला आहे. शिवाय, लसीच्या डोसची खरेदी- तुटवडा, सतत नव्याने येणारे नियम यामुळे लसीकरण हळूहळू सुरू आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना एक डोस देण्याचा निर्णय घेतल्यास लसीकरण मोहीम सर्वव्यापी आणि वेगाने करण्यास उपयोग होईल.

-डॉ. निरंजन खोत

टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्याआरोग्य