Join us  

नेहरूंचे विचारच लोकशाही, राज्यघटना अबाधित राखतील- काँग्रेस नेते मुकुल वासनिक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 8:43 AM

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत देशाच्या जडणघडणीतील नेहरूंचे योगदान तरुण पिढीला कळावे, यासाठी प्रा. पुरुषोत्तम अगरवाल यांचे ‘नेहरू : कल आज और कल’ या व्याख्यानाचे आयोजन पक्षाच्या टिळक भवन कार्यालयात करण्यात आले होते.

मुंबई : पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे विचारच देशातील लोकशाही आणि राज्यघटना अबाधित ठेवतील. नेहरू इतिहासात महत्त्वपूर्ण होतेच, वर्तमानातही महत्त्वपूर्ण आहेत आणि भविष्यातही राहतील, असे उद्गार बुधवारी प्रदेश काँग्रेस कार्यालयात आयोजित व्याख्यानात अखिल भारतीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी काढले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत देशाच्या जडणघडणीतील नेहरूंचे योगदान तरुण पिढीला कळावे, यासाठी प्रा. पुरुषोत्तम अगरवाल यांचे ‘नेहरू : कल आज और कल’ या व्याख्यानाचे आयोजन पक्षाच्या टिळक भवन कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी अगरवाल म्हणाले, महात्मा गांधी यांनी नेहरू यांना देशाचा नेता म्हणून निवडले हे योग्यच होते हे सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर एका वर्षातच स्पष्ट केले. नेहरू हे त्या वेळच्या नेत्यांमध्ये सर्वांत पुढचा विचार करणारे, दूरदृष्टी असणारे नेते होते. व्यासपीठावर काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, प्रणिती शिंदे, सहप्रभारी आशिष दुआ, सुरेश शेट्टी, उल्हास पवार उपस्थित होते.यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, भारतमाता कोण आहे, हे ज्यांना माहीत नाही तेच लोक आज भारतमाता की जय म्हणत त्याच भारतमातेला विकत आहेत. नेहरू यांच्याबद्दल खोटा, अपप्रचार सुरू आहे. नव्या पिढीला नेहरूंच्या योगदानाची कल्पना यावी, माहिती मिळावी यासाठी राज्यभर कार्यक्रम घेणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. आज देशावर, लोकशाहीवर, राज्यघटनेवर संकट आहे. ही परिस्थिती समजून काँग्रेसची विचारधारा, तिचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान याची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे वासनिक म्हणाले. तर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी पुरुषोत्तम अगरवाल यांच्या ‘कोण आहे भारतमाता’ या पुस्तकाबद्दल आपल्या भाषणात थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी केली. सूत्रसंचालन मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी तर विनायक देशमुख यांनी आभार मानले.

टॅग्स :जवाहरलाल नेहरूमुकूल वासनिक