मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रात पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालून फक्त सीएजनी व इलेक्ट्रिक वाहनांनाच परवानगी देण्याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची समिती राज्य सरकारने स्थापन केली आहे. माजी आयएएस अधिकारी सुधीरकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती तीन महिन्यांत सरकारला अहवाल सादर करेल.
मुंबई शहरातील वाहतूक कोंडी तसेच वाढते प्रदूषण याबाबत दाखल करण्यात आलेल्या सु-मोटो याचिकेवर आदेश देताना मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली होती. राज्य सरकारने न्यायालयाच्या या आदेशाची दखल घेतली असून तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन केली आहे. राज्याचे परिवहन आयुक्त, वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त, महानगर गॅसचे व्यवस्थापकीय संचालक, महावितरणचे प्रकल्प संचालक, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सचे अध्यक्ष हे या समितीचे सदस्य असतील. तर सहपरिवहन आयुक्त अंमल-१ महाराष्ट्र राज्य हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.