Join us  

तो मान फक्त बाळासाहेबांचा - राज ठाकरे; हिंदुहृदयसम्राट संबोधू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 5:18 AM

राज ठाकरे या बैठकीतून केवळ दहा मिनिटांत बाहेर पडल्याने उलटसुलट चर्चा रंगली.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्वाची वाट स्वीकारल्यानंतर कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट म्हणून संबोधण्यात येत आहे. या संबोधनावरून सोमवारी राज यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका. तो मान केवळ बाळासाहेबांचा आहे. मी बाळासाहेबांइतका मोठा नाही, अशी सूचना राज यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिली.गोरेगाव येथे नुकतेच मनसेचे महाअधिवेशन पार पडले. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना भारतातून हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा राज यांनी या अधिवेशनात केली होती. या मोर्चाच्या तयारीसाठीसोमवारी रंगशारदा सभागृहात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.या बैठकीला संबोधित करताना राज म्हणाले की, मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका. तो मान बाळासाहेबांचा आहे. मी त्यांच्या इतका मोठा नाही. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असणाºया झेंड्याबाबतही राज यांनी सूचना दिल्या.कोणत्याही स्थितीत या ध्वजाचा अवमान होता कामा नये. ज्या प्रभागात हा ध्वज लावला जाईल तेथील विभागप्रमुखावर त्याची जबाबदारी असेल. पक्षीय कार्यक्रमात शक्यतो रेल्वेचे इंजीन असलेला ध्वज वापरावा. ९ फेब्रुवारीला होणाºया मोर्चासाठी तयारीला लागा. जास्तीत जास्त लोक या मोर्चात सहभागी होतील, यादृष्टीने नियोजन करा, अशा सूचना राज ठाकरे यांनी या वेळी दिल्या.राज ठाकरे या बैठकीतून केवळ दहा मिनिटांत बाहेर पडल्याने उलटसुलट चर्चा रंगली. मात्र, राज यांना घशाचा त्रास सुरू झाल्याने ते थोडक्यात बोलून बाहेर पडल्याची माहिती मनसेतील सूत्रांनी दिली. यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी पदाधिकाºयांना संबोधित केले. आता ९ फेब्रुवारीच्या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष आहे.

टॅग्स :राज ठाकरेमनसे