Join us

मुंबई महापालिकेकडून आठ महिन्यांत केवळ ३० टक्के आरोग्य निधीचा विनियोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 01:04 IST

महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती; मूलभूत सुविधा वाऱ्यावर

मुंबई : मागील दोन वर्षांत महापालिकेच्या आरोग्य निधीत वाढ झाली. गेल्या आठ महिन्यांत पालिकेने मुंबईकरांच्या आरोग्यासाठी केवळ ३० टक्के निधी खर्च केला आहे. प्रशासनाला मुंबईकरांच्या आरोग्याची चिंता आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे.आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते नोव्हेंबर या काळातील ८०८. ५६ कोटी अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी २४५.२२ कोटी पालिकेच्या आरोग्य विभागासाठी करण्यात आली होती. २०१९-२० सालचे पालिकेचे आरोग्य क्षेत्राचे अर्थसंकल्पीय एकूण तरतूद ४ हजार १५१ कोटी रुपये आहे. २०१८-१९ साली ही तरतूद २ हजार ९१८ कोटी इतकी होती. पालिकेच्या आरोग्य क्षेत्राच्या निधीचा विनियोग मूलभूत सुविधांच्या विकासाकरिता करणे आवश्यक आहे. मात्र, आरोग्य क्षेत्रासाठीच्या निधीच्या खर्चाचा विचार केला असता, रुग्णालय व्यवस्थापन, अत्याधुनिक यंत्र, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांचा विकास झाल्याचे दिसत नाही.पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याविषयी सांगितले की, आरोग्य क्षेत्राच्या निधी खर्चाविषयी लवकरच पालिका विविध घटकांसोबतबैठक होणार आहे. या बैठकीत निधीच्या विनियोगाविषयी भविष्यातील दिशा ठरविण्यात येईल. आरोग्य निधीच्या खर्चावर नजर टाकली असता, प्राथमिक आरोग्यसेवेवर केवळ २४.४६ टक्के खर्च झाला आहे, तर उपनगरी रुग्णालयांच्या दर्जा सुधारण्यासाठी केवळ २९.४२ टक्के निधी वापरला आहे. पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी देण्यात येणाºया एकूण निधीच्या तुलनेत हा खर्च अत्यल्प असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे.जनआरोग्य अभियानाचे डॉ.अभिजित मोरे यांनी सांगितले की, प्रशासनाकडून कायम रुग्णसेवेवरील ताण कमी झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात आरोग्याच्या समस्यांत सुधारणा झालेली नाही. अजूनही आपल्याकडे औषधांचा तुटवडा, खाटांची कमतरता, नव्या मोहिमांचा अभाव आढळून येतो. आठ महिन्यांत केवळ ३० टक्के निधी वापरला जातो, ही चिंताजनक बाब आहे. आता उरलेल्या ७० टक्के निधीचे यंत्रणा काय करणार आहे, असा सवाल निर्माण झाला आहे. मुळात आपल्याकडे आरोग्यसेवेविषयी असलेल्या उदासीनतेमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, पालिका प्रशासनाने आता तरी उदासीनता झटकून सामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा दिली पाहिजे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका