Join us  

मुंबईत केवळ ३५८ खड्डे, पालिकेची आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 4:58 AM

मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका अधिकारी कामाला लागले आहेत. याबाबत तातडीची बैठक घेऊन ४८ तासांमध्ये खड्डे बुजविण्याची ताकीदच सर्व ठेकेदारांना प्रशासनाने शुक्रवारी दिली.

मुंबई - मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका अधिकारी कामाला लागले आहेत. याबाबत तातडीची बैठक घेऊन ४८ तासांमध्ये खड्डे बुजविण्याची ताकीदच सर्व ठेकेदारांना प्रशासनाने शुक्रवारी दिली. मात्र, मुंबईतील बहुतांशी रस्ते खड्ड्यात गेले असल्याची तक्रार सर्व नगरसेवक करीत असताना, महापालिकेच्या आकडेवारीनुसार केवळ ३५८ खड्डेच शिल्लक आहेत. त्यामुळे खड्डे भरण्याची मोहीम म्हणजे मुंबईकरांच्या डोळ्यांत धूळफेक असल्याचा आरोप होत आहे.गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबईतील बहुतांशी रस्ते खड्ड्यात गेले आहेत. याचे तीव्र पडसाद मुंबईतच नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयातही उमटले. मुंबईतील खड्डे बुजविण्याची पद्धत, त्यांचे आकडे याबाबतची माहिती न्यायालयाने मागविली आहे. या प्रकरणी सर्व पक्षीय नगरसेवकांनी धारेवर धरल्यानंतर, पुढील ४८ तासांमध्ये सर्व खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन प्रशासनाने गुरुवारी महासभेत दिले.त्यानुसार, पालिका मुख्यालयात शुक्रवारी तत्काळ खड्डे दुरुस्तीबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व खड्डे शनिवारी संध्याकाळपर्यंत भरण्याची मुदत ठेकेदारांना देण्यात आली.कोल्डमिक्स तंत्रज्ञान वापरून खड्डे भरण्यात येत आहेत. त्यामुळे पाऊस सुरू असतानाही खड्डे भरणे शक्य असल्याने जादा कामगार लावून खड्डे भरून घ्या, अशी सूचना करण्यात आली आहे, तसेच कोल्डमिक्सचा पुरवठा कमी पडू नये, याचीदेखील खबरदारी घेण्यात येत आहे.ठेकेदारांवरकारवाईचा बडगाकोल्डमिक्स तंत्रज्ञान रस्त्यावर प्रभावी ठरत असताना, ते फेल करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने खड्डे भरले जात आहेत. वांद्रे पूर्व येथील एका ठेकेदाराला या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. कोल्डमिक्स खड्ड्यात चुकीच्या पद्धतीने भरल्यास कारवाईचे संकेतच प्रशासनाने दिले आहेत.२९७ टनकोल्डमिक्सचा वापरकोल्डमिक्स हे परदेशी तंत्रज्ञान मुंबईच्या रस्त्यांवर प्रभावी ठरले, तरी ते प्रचंड खर्चिक आहे. त्यामुळे महापालिकेने या वर्षी वरळी येथील आपल्या कारखान्यात स्वत: कोल्डमिक्स तयार करण्यास सुरुवात केली. यामुळे मोठी बचत होत असल्याचा पालिकेच्या दावा आहे. आतापर्यंत २९७.७७ टन कोल्डमिक्स तयार करण्यात आले आहे. यापैकी २९३.२१ टन कोल्डमिक्स वापरण्यात आले आहे.६७४ खड्डे बुजविलेमुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक रस्ते खड्ड्यात गेले आहेत. याबाबत सर्वच नगरसेवक तक्रार करीत असताना, पालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत केवळ १,०३२ खड्डे आहेत. यापैकी ६७४ खड्डे आतापर्यंत बुजविण्यात आले आहेत, तर ३५८ शिल्लक आहेत.

टॅग्स :खड्डेमुंबई महानगरपालिका