आॅनलाईन शॉपिंग: कठोर कायदा हवा
By Admin | Updated: December 28, 2014 23:35 IST2014-12-28T23:35:44+5:302014-12-28T23:35:44+5:30
आॅनलाइन खरेदीमुळे अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना दिवसेंदिवस उजेडात येत आहेत. त्यामुळे अशा आॅनलाइन साइट्सवर बंधने

आॅनलाईन शॉपिंग: कठोर कायदा हवा
ठाणे : आॅनलाइन खरेदीमुळे अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना दिवसेंदिवस उजेडात येत आहेत. त्यामुळे अशा आॅनलाइन साइट्सवर बंधने आणून शासनाच्या महसूलाची वसुली करावी आणि फसव्या जाहिराती करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक संरक्षण सेवा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश गोपाळ जोशी यांनी राष्ट्रीय ग्राहकदिनी केली.
ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी (पुरवठा शाखा) यांच्या वतीने नुकताच राष्ट्रीय ग्राहक दिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला. या वेळी ई-कॉमर्स ग्राहक जनजागृती व फसव्या जाहिराती या विषयावर जनजागृतीपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहन नळदकर, ग्राहक संरक्षण सेवा समितीचे राष्ट्रीय सचिव दयानंद नेने, सचिव सुरेश मोहिते, महाराष्ट्र महिला संघटक सुरेखा देवरे, ठाणे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक संजय भोईर, वैधमापन विभागाचे दिलीप चव्हाण, औषध विभागाचे कैलास आपेकर आदी अधिकारीवर्ग आणि नागरिक उपस्थित होते.
ग्राहकाने आॅनलाइन एखादी वस्तू बुक केल्यावर त्याच्या दिलेल्या पत्त्यावर ती २४ तासांच्या आत पाठवली जाते. बहुतांश वस्तू या परराज्यांतून आलेल्या असतात. अतिशय वेगवान व आधुनिक पद्धतीचा वापर करून या वस्तू बाजारभावापेक्षा अतिशय कमी किमतीत ग्राहकाला दिल्या जातात. वास्तविक, ही वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत विक्री, प्राप्ती, जकात, एलबीटी हे शासनाचे सर्व कर बुडवले जातात.
यामुळे शासनाचा अनेक कोटी रु पयांचा महसूल बुडत आहे. तसेच कमी किंमतीत दिलेली वस्तू निकृष्ट दर्जाची निघाल्यास त्याची तक्रार करण्यास कुठेही वाव नसतो. याबाबत, शासनाने कडक कायदा करावा व आपले महसूल उत्पन्न जमा करावे व ग्राहकांचीही फसवणूक होणार नाही, असे मत जोशी यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)