Join us  

आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडूनही विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 4:41 PM

लॉकडाऊनच्या काळात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ऑनलाईन युट्यूब चॅनल सुरु केले...

मुंबई :  लॉकडाऊनच्या काळात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ऑनलाईन युट्यूब चॅनल सुरु केले असून, ‘झूम’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लाईव्ह लेक्चरची सुविधाही उपलब्ध करुन दिल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांना दिली. राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरुंशी संवाद साधत शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. 

 

आरोग्य विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अभ्यासक्रमाशी संबंधित ऑनलाईन लेक्चर्स उपलब्ध करुन दिले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात माहिती, तंत्रज्ञान व कम्युनिकेशनचा प्रभावी वापर केला जात असून, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि क्लाऊड सर्व्हरवर ७०० पेक्षा अधिक रेकॉडेड लेक्चर, पॉवर पॉईन्ट सादरीकरण अपलोड केले आहेत. झूमद्वारे लाईव्ह लेक्चर दिले जातात. याचा विद्यार्थी व शिक्षकांना फायदा होणार असून, ऑनलाईन शिक्षणासाठी एमयूएचएच लर्निंग नावाचे यु ट्यूब चॅनल सुरु केले आहे. आजवर तीस हजार विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतल्याचे कुलगुरु डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले. 

 

ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी विद्यापीठाने ऑमनिक्युरस संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. त्याचा विद्यार्थी व शिक्षकांना अद्यावत ज्ञान मिळवण्यासाठी उपयोग होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इन्फोर्मेशन, कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजीचा प्रभावी वापर करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने आदेशित केलेले आहे. विद्यार्थी इंटरनेटद्वारा संगणक, मोबाइल व टॅब्लेटवर लाइव्हल लेक्चर व संवाद साधता येणार आहे. विद्यापीठाने आॅनलाइन शिक्षणाकरिता ‘एमयूएचएस लर्निंग’ नावाने यू-ट्यूब चॅनल सुरू केले असून, आजवर तीस हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे.

टॅग्स :शिक्षणकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस